Pimpri : पाण्याचे राजकारण करु नका – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणीसाठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत विरोधकांनी पाण्याचे राजकारण करु नये, असे सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले.
अनियमित पाणीपुरवठ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत अधिका-यांना कोंडून ठेवले होते. त्यावर बोलताना एकनाथ पवार म्हणाले, राष्ट्रवादीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याबाबत पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. पवना बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी शेतकर्यांशी सदनशील मार्गाने चर्चा सुरू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.
महापुरूषांच्या जयंती, उत्सव आणि सण महापालिकेने साजरे करू नयेत, असे न्यायालयासह राज्य शासनाचे निर्देश आहेत. तरीही, महापुरूषांचे विचार नागरिकांमध्ये पोहचावे म्हणून खासगी तत्वावर प्रबोधन विचार पर्व साजरा केला जात आहे. पालिकेकडून स्मृतिचिन्ह देण्याची परंपरा बंद केली आहे. त्यामुळे खासगी संस्थांकडून कार्यक्रमावर खर्च केला जात आहे. अनवधानाने पालिकेचे लोगो वापरून स्मृतिचिन्ह बनविले गेले. त्या संदर्भात संबंधितांना समज दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.