Talegaon Dabhade : चित्रपट या माध्यमाकडे फक्त करमणूक म्हणून न पाहता एक कला म्हणून अभ्यास करणे गरजेचे आहे- डॉ.अनंत परांजपे

कलापिनीमध्ये 'फिल्म क्लब'ला उत्साहात सुरवात...

एमपीसी न्यूज – ‘चित्रपट या माध्यमाकडे फक्त करमणूक म्हणून न पाहता एक कला म्हणून अभ्यास करणे गरजेचे आहे.’ हाच विचार मनात ठेवून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रातकै. शं. वा. परांजपे नाट्यसंकुलामध्ये ‘अवकाश’ या मिनी थिएटर मध्ये २६ ऑगस्ट, शनिवारी ‘कलापिनी फिल्म क्लब’ ची पुन्हा एकदा जोमाने सुरवात झाली.

Nigdi : गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे बुजवा; मनसेची मागणी

डॉ. विनया केसकर यांनी स्वागत केल्यानंतर कलापिनीच्या कलाकारांनी लिहिलेल्या, संगीतबद्ध आणि चित्रित केलेल्या ‘करुण एक प्रार्थना’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यातील गायक व संगीतकार अक्षय म्हाप्रळकार, गायक विराज सवाई आणि संकलक अनिरुद्ध जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पूजा डोळस हिने केले.

प्रास्तविक करताना कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी चित्रपट विषयक अनेक आठवणींना उजाळा देत पुढे फिल्म क्लब च्या माध्यमांतून विविध चित्रपट दिग्दर्शक यांच्यावर अभ्यासपूर्ण कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ सदस्य विश्वास देशपांडे यांनी चित्रपट अभ्यासणे आणि निर्माण करणे म्हणजे नेमकं काय याविषयी सांगितले.

या वर्षीच्या पहिल्या स्क्रिनिंगसाठी ‘वारं’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या लघुपटाची निवड करण्यात आली होती. या मध्ये कलापिनीच्याच सायली रौंधळ हिची प्रमुख भूमिका असून तिला अभिनयाचे विशेष पारितोषिक सुद्धा मिळाले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी खास संगमनेरहून लघुपटाचे लेखक-दिग्दर्शक सत्यम पारखे व ओंकार कुलकर्णी तसेच सहकलाकार स्वप्नील खंबायत हे आवर्जून उपस्थित होते.

लघुपटाची निर्मिती करतानाचे अनेक अनुभव सांगत त्यांनी प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला. या फिल्म क्लब ची नव्याने सुरुवात करताना, अशाच पद्धतीने चित्रपट आणि त्याचे निर्माते सोबत घेऊन अभ्यासपूर्ण वाटचाल करणार असल्याची ग्वाही पूजा डोळस आणि चैतन्य जोशी यांनी दिली. संपूर्ण कार्यक्रमासाठी अभिलाष भवार, प्रतिक मेहता यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. चैतन्य जोशी याने आभार मानले. मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित झाले आणि कार्यक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.