Chakan : रिलायन्स जिओ कडून विनापरवाना खोदकाम ?

नगरपरिषद म्हणजे कसलीही परवानगी नाही 

एमपीसी न्यूज – चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक रस्त्यालगत रिलायन्स जीओ कंपनीच्या केबल लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात येत आहे. संबंधित खोदकाम करणाऱ्या ठेकेदार मंडळींनी चाकण नगरपरिषदेकडून परवानगी घेतल्याचा दावा केला असून नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी मात्र संबंधित कंपनीला खोदकाम करण्यासाठी कसलीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चाकण मधील रिलायंस कंपनी कडून पूर्वीप्रमाणेच खोदकाम परवानगीचा गोंधळ घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील आठवड्याभरापासून शहरात माणिक चौक ते मार्केटयार्ड दरम्यान अनेक ठिकाणी खोदकामात सिमेंटचा रस्ता फोडण्यात आला आहे. दिवसरात्र काम करून रिलायन्स जिओ कंपनीने जमिनीखालील पाण्याच्या लाईन, बीएसएनएलच्या केबल, विजेच्या केबल याचा कसलाही आढावा न घेता खोदकाम केल्याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. शक्य असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेने तर काही ठकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून अनधिकृतपणे केबल लाईनचे खोदकाम सुरू आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी खोदकाम  करण्याकरिता रिलायन्स जिओ कंपनीने कोणतीही परवानगी स्थानिक नगरपरिषदेकडून घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विनापरवाना खोदकाम होत असताना संबंधित ठेकदार मात्र चाकण नगरपरिषदेकडून परवानगी घेतल्याचा दावा करीत आहेत.

खोदकाम थांबविले : डॉ. नीलम पाटील (मुख्याधिकारी, चाकण न.प.)
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने शहरात सुरु केलेल्या खोदकामाच्या बाबत कुठलीही परवानगी नगरपरिषदेकडून घेतलेली नाही. संबंधित कंपनीकडे या बाबत विचारणा केली असता नगरपरिषदेत रक्कम भरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संबंधित रक्कम कशासाठी भरली, कधी भरली, याचा काहीही तपशील नसल्याने त्यांना तत्काळ काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतची सर्व कागदपत्रे घेऊन सुनावणी साठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत कोणताही खुलासा अथवा लेखी म्हणणे कंपनीच्या वतीने अद्याप पर्यंत सादर केले गेलेले नाही.

पुन्हा तोच प्रताप? :
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने चाकण मध्ये २०१३ ते २०१४ दरम्यान केबल टाकण्याचे काम करताना झालेल्या ६८ लाखांच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी घटनेच्या नंतर चार वर्षांनी (ऑगस्ट २०१७ मध्ये) चाकण पोलिसांत तत्कालीन उपसरपंच, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि चाकण मधील सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष व सचिवांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र रिलायन्स जिओ कंपनीने दिलेल्या त्या ६८ लाखांच्या डीडीचे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात असताना पुन्हा त्याच पद्धतीने गुपचूप काही रक्कम नगरपरिषदेत भरून वारेमाप खोदकाम झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.