Jodhpur : कमलेश छाजेडच्या अडचणीत वाढ, आणखी दोन गुन्हे दाखल

विरोधातील बातमी व्हायरल करणाऱ्यांना   विनभंगातील आरोपीकडून थेट धमकी

एमपीसी न्यूज – विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्याशी संबंधित बातमी सोशल मिडीयावर व्हायरल होताच, बातमी फॉरवर्ड करणाऱ्या नागरिकांना फोन करून तसेच थेट घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जोधपूर (Jodhpur) येथील कुडी भगतासनी व देवनगर या पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळाचा संघटन मंत्री कमलेश छाजेड तसेच कुलवंत छाजेड व महेन्द्र छाजेड यांच्यावर धमकावणे, विनयभंग केल्याप्रकरणी भगतासनी (Jodhpur) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. तर कमलेश याचा मुलगा छगनलाल छाजेड याच्यावर देवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. डुगरचंद छाजेड यांनी याप्रकरणी देवनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 8) फिर्याद दिली.

याबबत माहिती अशी की, कमलेश छाजेड याने एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी विनयभंग, धमकी आणि बदनामी प्रकरणी जोधपूर (Jodhpur) महानगर न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याची सहा वर्षे होऊन गेले तरीही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची जलदगतीने व सलग सुनावणी करून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. एस. मेहता यांनी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून मागणी केली होती. याबाबतचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने प्रकाशित केले होते.

वरील फिर्यादी यांनी या वृत्ताची लिंक काही व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल केली. याचा राग येऊन आरोपी कमलेश, कुलवंत छाजेड, महेन्द्र छाजेड यांनी फिर्यादी महिलेला फोन करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच लोकेशन पाठवण्यास सांगत घरात घुसून घरातील सर्वांनाच जिवे मारण्याची धमकी दिली.

तर दुसऱ्या घटनेत डुगरचंद छाजेड यांनी कमलेशबाबत व्हॉटसअपवर केलेल्या चर्चेचा राग येवून कमलेश हा त्याच्या काही गुंड साथीदारांसह कारमधून आला, त्याने फिर्यादीच्या घरच्यांना जिवे मारण्याची व सामानाचे नुकसान करण्याची धमकी दिली. यावरून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मात्र जामिनीवर असणारा कमलेश हा त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना दमदाटी करत असून त्यांना धमकावत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरीत त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.