Jodhpur : सहा वर्षे होऊनही विनयभंगाच्या दाव्याची सुनावणी सुरूच, खटला जलद निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयास साकडे

एमपीसी न्यूज – विनयभंग, धमकी आणि बदनामी प्रकरणी जोधपूर महानगर न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याची सहा वर्षे होऊन गेले तरीही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची जलदगतीने व सलग सुनावणी करून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी अखेर जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना साकडे घालण्यात आले आहे.

Pimpri : शिवणे, गहूंजेतील बंधा-याचे काम प्रगतीपथावर

मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. एस. मेहता यांनी या प्रकरणी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयास लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे.
अखिल भारतीय छाजेड परिवार मंडल या संस्थेचा संघटन सचिव असलेल्या कमलेश छगनलाल छाजेड (रा. सिवाना, जि. बाडमेर, सध्या रा. 211-ए, हेमू कॉलनी, नाकोडा नगर, गांधी धाम) याच्या विरुद्ध जोधपूरच्या सीएचबी पोलीस ठाण्यात पाच ऑगस्ट 2016 रोजी एका 42 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली. या प्रकरणी सुनावणी करून पोलिसांनी कमलेश मेहता याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 354 व 509 अन्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी तपास करून जोधपूर महानगर न्यायालयात 2017 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. सहा वर्षे होऊन गेल्यानंतरही हे प्रकरण अजूनही प्रलंबित असल्यामुळे पीडित महिलेला प्रचंड मानसिक त्रास होत असून वैद्यकीय समस्यांमध्येही वाढ झाली असल्याचे मेहता यांनी न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. समाजात तथाकथित प्रतिष्ठेचा बुरखा लावून वावरत असलेल्या आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मेहता यांनी केली आहे.
नवरात्रौत्सवात बिरामी येथील भुवाल माता मंदिरात छाजेड समाजातील भाविक मोठ्या संख्येने जमतात. त्या ठिकाणी आरोपी कमलेश छाजेड व फिर्यादी महिलेच्या पतीची ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी पीडित महिला एकटी असताना तिच्या घरात जबरदस्तीने घुसला व तिच्याशी गैरवर्तणूक केली. पीडित महिलेने आरडाओरडा केला आणि वडिलांना फोन लावल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
त्यानंतर फिर्यादीच्या पतीने कमलेशला फोन करून समजावून सांगितले. यापुढे असे करणार नाही, असे आरोपीनेही कबूल केले. समाजात चर्चा होऊ नये म्हणून फिर्यादीने त्यावेळी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही, असे दाव्यात म्हटले आहे.
त्यानंतर आरोपीने तिच्या पतीला तसेच नातेवाईकांना फोन करून  खोटं-नाटं सांगून फिर्यादीची सातत्याने बदनामी केली तसेच फोनवर अर्वाच्च शिवीगाळ केली. फिर्यादीला एसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कमलेश याच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी कमलेश छाजेड याला 22 सप्टेंबर 2016 ला अटक करून न्यायालयात हजर केले. पुढे न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर हा खटला सुरू आहे. मात्र खटल्याच्या सुनावणीत किंचिंतही प्रगती होताना दिसत नाही.
न्यायाला विलंब लावणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून या खटल्याची सलग सुनावणी घेण्याबाबत आदेश द्यावेत व पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा, असे मेहता यांनी पत्रात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.