Kamshet : महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा चॉकलेट शिंदे पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – व्यापा-याचे अपहरण करून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागणा-या आणि महिनाभरापासून पुणे ग्रामीण पोलिसांना गुंगारा देऊन पसार असलेला चॉकलेट शिंदे सोमवारी (दि. 5) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कान्हेफाटा येथे सापळा रचून कामशेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

धनेश ऊर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (वय 29, रा. कामशेत, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील व्यापारी अनुराग सुरेश गदिया (वय 29) यांचे चॉकलेटच्या टोळीने 8 जुलै रोजी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून पवनानगर धरणाजवळ नेले. तिथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती 25 लाख रुपये खंडणी ठरवून पहिला हप्ता 10 लाख रुपये 10 जुलै रोजी कामशेत येथे देण्यास सांगितले. त्यानंतर कायमस्वरूपी हप्ता देण्याची धमकी दिली. खंडणी न दिल्यास पुन्हा अपहरण करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चॉकलेट शिंदेच्या टोळीतील सदस्यांची शोधाशोध सुरु केली. टोळीचा म्होरक्या चॉकलेट पोलिसांना गुंगारा देऊन महिनाभरापासून फरार होता. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी चॉकलेटच्या टोळीवर मोक्काची कारवाई केली. सोमवारी (दि. 5) रात्री चॉकलेट कान्हेफाटा येथे येणार असल्याची माहिती कामशेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार कान्हेफाटा परिसरात सापळा रचून चॉकलेट शिंदे याला शिताफीने पकडले.

  • ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बी बी पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार एम एम मागते, पोलीस कर्मचारी एस व्ही घोलप, एम व्ही दौंडकर, व्ही. एम. सकपाळ, आर. एस. चव्हाण, ए. बी. भाग्यवंत, व्ही एम कामठे, डी. एस. शिंदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.