Karjat News : कर्जत शहर आणि तालुक्यातील 32.58 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी

भिसेगाव - कर्जत शहराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आभार

एमपीसी न्यूज – नेरळ, कर्जत शहर आणि कर्जत तालुक्यातील 15 विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने भिसेगाव ते कर्जत शहराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कर्जत शहर आणि ग्रामीण विभागासाठी 17.58 कोटी रुपयांचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएआरडीए) कडून मंजूर करण्यात आला आहे.

कर्जत शहर व ग्रामीण भागातील विकासकामांना निधी मिळावा यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून 32 कोटी 58 लाख रुपयांचा निधी आणला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या खासदार निधीचा सर्वाधिक वापर कर्जत, खालापूर या मतदार संघासाठी केला आहे. भिसेगाव ते कर्जत शहराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. मात्र निधी अभावी हे काम होऊ शकत नव्हते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सुरुवातीला रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला आणि भुयारी मार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळवली. त्यानंतर निधीअभावी हे काम काही दिवस रखडले. खासदार श्रीरंग बारणे यांनी एमएमआरडीए कडून 15 कोटींचा निधी आणून नागरिकांसाठी विकासाचे मोठे काम केले आहे. आगामी कालावधीत कर्जत शहरातून बाहेर पाडण्यासाठी चांगला मार्ग निर्माण होईल. त्याचबरोबर वाहतुकीची देखील समस्या सुटेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.

कर्जत शहराच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कर्जत शहरातील विकासकामांच्या बाबतीत खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कर्जत शहरातील विविध विकास कामांसाठी 13.33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये कर्जत नगरपरिषद हद्दीतील शिवम सोसायटी ते फायर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपये. कर्जत नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट मल्टीपर्पज युनिट करण्यासाठी दोन कोटी रुपये, कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली येथील विठ्ठल मंदिर ते रमाकांत जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी 4.34 कोटी रुपये, कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले बामचा मळा येथील रस्ता करण्यासाठी 4.99 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नेरळ येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब चौक ते कल्याण हायवे पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कर्जत ग्रामीण भागाला सव्वातीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये कर्जत-कल्याण राज्यमार्ग ते पालीवाडी रस्त्याच्या कामासाठी 25 लाख रुपये. कर्जत-कल्याण राज्यमार्ग ते गारपोली गावा पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 25 लाख रुपये. नेरळरोड ते धारेवाडी रस्ता करण्यासाठी 25 लाख रुपये, मार्केवाडी ते ठोंबरवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये, भोईरवाडी ते तांबसवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये, कडावगाव ते वडवली गाव रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये निधी मिळाला आहे.

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडाव येथील तलावाचे सुशोभीकरण करणे व संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रुप ग्रामपंचायत कडाव येथील तांबस रोड ते माणकीवली गाव रस्ता करण्यासाठी 25 लाख रुपये आणि ग्रुप ग्रामपंचायत कडाव येथे दशक्रिया विधी घाट बांधण्याच्या कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

कर्जत, नेरळ शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळवला आहे. पुढील काही दिवसात ही कामे पूर्ण होणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकास कामांना मूर्तरूप दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.