Pune News : रविवारी 220 महाविद्यालयात होणार राज्यस्तरीय पात्रता परीक्षा

हेल्पलाईन क्रमांक जाहीर: कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

 

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) यांच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार दिनांक 26 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता या 37व्या सेट परीक्षेचे आयोजन केले आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा राज्य अशा एकूण15 ठिकाणी ही परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकूण 220 महाविद्यालयांमध्ये सेट परीक्षेचे आयोजन केलेले आहे. या परीक्षेसाठी 98 हजार 360 विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. 15 हजार 623 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी पुणे शहर केंद्र निवडले असून या सर्व विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील 30 महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. दिनांक 16 सप्टेंबर, 2021 पासून परीक्षेची प्रवेशपत्रे  http://setexam.unipune.ac.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

कोव्हीड-१९ महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात सेट परीक्षा केंद्र असलेल्या सर्व ठिकाणच्या संपर्क प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी त्याबाबत महाविद्यालयांना सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच सर्व महाविद्यालयांना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सेट परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी ०२०- २५६२२४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सेट परीक्षेचे सदस्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.