Chinchwad Crime News : दिवसा घरे हेरून रात्री घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक; 48 घरफोडीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – दिवसा कुलूपबंद असलेली घरे हेरून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचे चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून दागिने घेणाऱ्या एका सोनाराला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होमथिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

साहील रमेश नानावत ऊर्फ अल्लु अर्जुन (वय 25, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे), देवदास ऊर्फ दास रमेश नानावत (वय 23, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे), योगेश नुर सिंह (वय 34, रा. नाकोडा ज्वेलर्स, एस.टी. स्टॅड जवळ, ता. पौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. त्यामध्ये सहा जणांची एक टोळी घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील दोन चोरटे सख्खे भाऊ असून ते दौंड तालुक्यातील भांडगाव येथे त्यांच्या नातेवाईकाच्या घरात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून साहिल आणि देवदास या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की, मागील तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या आणखी चार साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. बंद घरांचे कुलूप तोडून, दुकानाचे शटर उचकटून हे चोरटे चोऱ्या करत होते. त्यांनी चोरलेले सोने एका सोनाराला विकले आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला देखील अटक केली.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी 13, सांगवी तीन, वाकड एक, तळेगाव दाभाडे 12 आणि वाकड पोलीस ठाण्यातील एक असे 29 तसेच पुणे ग्रामीण मधील पौड सात, वडगाव मावळ सहा, कामशेत तीन, घोडेगाव पोलीस ठाण्यातील तीन असे घरफोडीचे 19 गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होमथिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी पौड व मावळ परिसरात जंगलात डोंगर पायथ्याशी अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करून विकण्याचा धंदा करत होते. ज्या भागात चोरी करायची आहे, त्या भागात दिवसा फिरून कुलूप बंद घरे हेरत असत. रात्रीच्या वेळी त्या घरांचे कटावणी व कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरी करत असत. हे आरोपी बंद दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम आणि किराणा माल देखील चोरी करत होते. चोरी केलेल्या पैशांमधून चोरटे महागडे कपडे, स्पोर्ट्स बाईक वापरणे, अशा हौसा पूर्ण करत होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, संतोष असवले, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, आदिनाथ ओंबासे, सु. व. गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.