Khed : तांदळाच्या पिंडीचे दोंदे गाव

एमपीसी न्यूज – हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा श्रावण,महिना सणवार धार्मिक कृत्ये,व्रतवैकल्ये याच बरोबर ( Khed ) धार्मिक पर्यटनाचाही पवित्र महिना . यातही श्रावणी सोमवारचे महत्त्व वेगळेच. प्रथा परंपरेनुसार श्रावणी सोमवारी जवळच्या शिवमंदिरात जाण्याची परंपरा आहे.
सहावे ज्योर्तिलिंग असलेल्या डांकिन्या भीमाशंकर पासून उगम  पावत वाहत येणाऱ्या पवित्र भीमा  नदीच्या तीरावर राजगुरूनगर पासून 6 /7 कि .मी.अंतरावर वसलेल्या खेड तालुक्यातील दोंदे गावात भीमा नदीच्या दक्षिण तीरावर छोटेखानी प्राचीन असणारे श्री दक्षिणेश्वर नावाचे शिवमंदिर पंचक्रोशीत प्रसिध्द आहे.या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी घडवचिवर नारळ व वेगवेगळ्या फळांच्यावर एकावर एक 5 तांदळाच्या पिंडीचे दर्शन व शिवास (शंकरास)पूजण्यास भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते.या पूजा विधी मध्ये पांढरे फुल ,बेलपान,धोतरा फुल,शिवामुढी चे धान्य आदी वस्तू सह प्रसादासाठी साखर फुटाणे,शेंगदाणे ,गुडदाणी आदी गोड वस्तूचा समावेश असतो.
श्रावणी सोमवारी शिवलिंगास अभिषेक करून तांदळाची पिंड उभारण्यात येते. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते.या आगळ्या वेगळ्या स्वरूपातील ,पिंडीचे दर्शन घेण्यास भाविक मोठ्या प्रमाणात दोंदे गावी ( Khed ) येतात.

निसर्गरम्य भिमानदीच्या तीरावर असणाऱ्या देवालयातून भव्य व विराट रूप धारण करणाऱ्या भीमा नदीचे रूप नयनमनोहर वाटते.या मंदिरा समोरच ही भीमा नदी दक्षिण वाहिनी वाहते.म्हणूनच मंदिराचे नाव श्री दक्षिणेश्वर असे आहे.आपल्या हिंदू धर्मात दक्षिणेकडे वळत असणारी नदी जवळ जागा पवित्र मानली गेलेली आहे.
याच बरोबर भीमाशंकर  येथून प्रवाहित होत असलेली नदी प्रथमतः चास येथील श्री सोमेश्वर ,दोंदे येथील श्री दक्षिणेश्वर ,वडगांव पाटोळे येथील श्री कमळेश्वर व राजगुरूनगरचे ग्रामदैवत  असणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी दक्षिण वाहिनी वाहते.यावरून या मंदिराचे व त्या गावांचे धार्मिक महत्त्व स्पष्ट होते.यावरून भीमा नदीला धार्मिक कार्यात अनन्य साधारण महत्व प्राप्त होते.या भीमा नदीच्या धार्मिकतेचा व पवित्रतेची  महती भीमा महात्म्य या पोथीत प्रकट होते.
शेती व पशुपालन व्यवसाय असणाऱ्या दोंदे गावात धार्मिक वसा व वारसा जपत आहे.प्राचीन काळापासून या गावात गणपती, श्रीराम,श्री विठ्ठल रुक्मिणी ,मारुती व भैरवनांथचे मंदिर  असून चैत्र महिन्यात राम नवमीस यात्रा भरवली जाते.या दिवशी नवसाचे बगाड फिरवण्याची परंपरा जपली गेलेली ( Khed ) आहे.
लेखक -राजेंद्र शरदचंद्र सुतार
परिसर अभ्यासक ,राजगुरूनगर जि.पुणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.