Chinchwad : पारंपारिक कामातच कार्यकुशलता आणून त्यास आधुनिकतेची जोड देऊन आपला विकास  साधावा – राजीव भिसे

कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित कौशल्य विकास मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – असंघटीत  कामगारांचे जीवन संघर्षमयी असले तरी पारंपारिक कामातच कार्यकुशलता आणून त्यास आधुनिकतेची जोड देऊन  आपला विकास साधावा, असे अवाहन मुंबई येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजीव भिसे यांनी कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित कौशल्यविकास मेळाव्यात केले.

यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, अनिल बारावकर, तुषार घाटूळे, समन्वयक मानिषा  राउत, माधुरी जलमुलवार, दादा खताळ, अरुणा सुतार, सुखदेव कांबळे, सखाराम हान्गे, अविदा गायकवाड, उषा भिसे, वर्षा हंकारे, सारिका मिसाळ, छाया येडगे, सुनिता पखवाले, वंदना थोरात आदींसह शहरातील विविध भागातील असंघटित कामगार उपस्थित होते.

यावेळी भिसे म्हणाले असंघटित कामगाराकडे आपल्या हातामध्ये मोलाची गुणवत्ता आहे, यात शंका नाही. मात्र, पांरपारिक कामाबरोबरच आधुनिकतेची कास धरत त्यात आवश्यक बदल करावा. त्यातूनच आपला विकास करता येईल. महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने उभ्या केलेल्या पणन  संस्था, बेंगलोर येथील कामगारांनी उभारलेली कामगार सूची, यातून नवीन पर्याय निर्माण झाले व कामाचा दर्जा व कामाचे प्रमाण वाढले आहे. यापुढे अधिकाराच्या लढाई बरोबर अस्तित्वाची लढाई लढावी लागेल आणि छोट्या छोट्या व्यवसायातून मार्केटिंगचे प्रशिक्षण दिल्यास सध्याच्या युगात हे असंघटित कामगार टिकतील.

काशिनाथ नखाते यांनी महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना भेडसावणारे प्रश्न मांडत, फेरीवाला घटकास आता मॉल संस्कृतीशी लढावे लागणार असून त्याहीपेक्षा उत्तम दर्जा व वस्तू विक्री कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचे नमूद केले. विधवा महिला यांना व्यवसाय प्रशिक्षणातून त्यांना उभे करणे शक्य आहे. पुढील काळात कामगारांची स्वतःची बाजारपेठ व केंद्र उभारता येईल. बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण दिल्यास यापुढे सुरक्षिततेसह आर्थिक विकास साधता येणे शक्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.