Talegaon : कारची दुचाकीला धडक; पती-पत्नी गंभीर

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथे सागर स्नॅक्स सेंटरच्या समोर झाला.

जयश्री सुरेश काळे (वय 40), सुरेश दत्तात्रय काळे (वय 45, दोघे रा. विद्याविहार कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. जयश्री यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार कार चालक गणेश कृष्णा कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री आणि सुरेश हे पती-पत्नी रविवारी दुपारी भाजी-पाला आणण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात दुचाकीवरून (एम एच 14 / बी एच 7451) जात होते. ते सागर स्नॅक्स सेंटर येथे आले असता समोरच्या दिशेने भरधाव वेगात एक स्विफ्ट कार (एम एच 14 / ई यू 3042) आली. कारने काळे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये काळे दांपत्य गंभीर जखमी झाले. कार चालकाने कार न थांबवता तशीच भरधाव वेगात पुढे नेली. पुढे कारने आणखी एका दुचाकीला (एम एच 14 / जी झेड 2542) धडक दिली. घटनेनंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी काळे दाम्पत्याला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत जयश्री यांनी तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली.  तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.