Lonavala : विधानसभेसाठी एक संधी द्या; मावळचा चेहरामोहरा बदलून दाखवतो – सुनील शेळके

'माझ्या प्रचाराचा नारळ जनतेनीच फोडला'

एमपीसी न्यूज- विधानसभेसाठी एक संधी द्या; मावळ तालुक्याचा विकासाच्या माध्यमातून चेहरा-मोहरा बदलून दाखवतो असा विश्वास भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी व्यक्त केला. माझ्यावर विश्वास ठेवत पाठीशी उभे रहा, असे भावनिक आवाहन शेळके यांनी केले.

लोणावळा शहरात आयोजित ‘आम्ही लोणावळाकर’ या कार्यकर्ता स्नेह मेळाव्यात शेळके बोलत होते. ग्रामीण भागात ग्रामदैवतेच्या दर्शनाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता लोणावळेकरांनी दाखविलेला पाठिंबा आत्मविश्वासाला नवे बळ देणारा असल्याचे शेळके यांनी सांगितले.

मेळाव्यास माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मंजुश्री वाघ, नगरसेवक भरत हारपुडे, सेजल परमार, माजी नगरसेवक बाळासाहेब कडू, संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व उद्योजक नंदकुमार वाळुंज, भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, राजू चौहान, दादा धुमाळ, गणेश इंगळे, रमेश पाळेकर, मुकेश परमार, उमेश तारे, अविनाश पवार, माजी नगरसेविका आशाताई खिल्लारे, सलिमभाई मणियार, नीलेश आगरवाल, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नामदेवराव डफळ, प्रकाश पगावाला, तळेगांव नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप शेळके, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत घुले, माजी नगरसेविका जयश्रीताई काळे, प्रकाश काळे, प्रवीण वर्तक, कांचनताई लुणावत, पल्लवी चोरडिया, गणेश इरले, जाकिर खलिफा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील शेळके म्हणाले की, मागील काही वर्षात मावळ तालुक्याची स्वखर्चातून सेवा केली, मात्र तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ता महत्वाची आहे. सहा महिन्यांत लोणावळा शहरात जिल्हा रुग्णालयात करण्याचे आश्वासन दिले तसेच शहरातील पर्यटन विकास, मावळात युवकांच्या हाताला रोजगार, रस्ते, आरोग्य सुविधा देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

कोणाला कोणाच्या प्रचाराचा नारळ फोडायचा तो फोडू द्या, माझा नारळ माझ्या कार्यकर्त्यांनी फोडला आहे, असा टोला हाणत शेळके यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

लोणावळा शहर भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी म्हणाले, “सबका साथ सबका विकास व सबका विश्वास सुनील शेळके यांनी जपला आहे”. शेळके यांच्या उमेदवारीचे समर्थन व राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर निशाणा साधताना शेट्टी म्हणाले की, योग्य वेळी भाकरी फिरवली नाही तर ती करपते म्हणून आता भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. काही मंडळींचे कान सत्तेमुळे बधिर झाले आहेत, आमचा आवाज त्यांच्यापर्यत पोहचला नाही. आण्णा तिकिट कोणाचेही मिळो तुम्ही आता माघार घ्यायची नाही, आम्ही सर्वजण सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी उभे आहोत. केवळ भाजपचेच नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आमदार म्हणून पाहणे हे आमचे लोणावळेकरांचे स्वप्न आहे.

भरत हारपुडे म्हणाले की, सध्या सत्ताधार्‍यांच्या चमच्यांची संख्या वाढल्याने पक्षांची वाट लागत आहे. चहा पेक्षा किटली गरम अशी सध्या स्थिती असल्याने निष्ठावंतांना किंमत राहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ म्हणाल्या,”सुनील आण्णा आमदार होण्याची वाट पहात आहे, त्यांच्या विजयानंतर 101 वेळा सेल्फी काढण्याचा माझा मानस आहे”

यावेळी लोणावळा शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी मनोगते व्यक्त केली. भाजपाचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र चौहान यांनी सूत्रसंचालन केले तर माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.