Pune : पुणे, पिंपरी चिंचवड शहराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले

एमपीसी न्यूज- सोमवारी (दि. 23) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात मुसळधार पावसाने झोडपले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी काल, मंगळवारी मध्यरात्री पावसाने पुन्हा शहराला झोडपले. या पावसाने पुणे शहरात झाडपडीच्या 13 घटना तर 24 ठिकाणी पाणी साठल्याचा घटना घडल्या.

मंगळवारी (दि. 24) दिवसभर अधून मधून ढगाळ वातावरण पसरले होते. संध्याकाळी आकाशात काळे ढग जमा झाले.रात्री सात वाजण्याच्या सुमारास हळू हळू पावसाळा सुरुवात झाली. सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु झाला. थोड्यावेळाने मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या.

या पावसामुळे पुणे शहरात हडपसर, गुरवार पेठ, बाणेर, शिवाजीनगर, बिबवेवाडी, नवी पेठ, येरवडा, सिंहगड रस्ता या भागात झाड पडण्याच्या घटना घडल्या. तर अप्पा बळवंत चौक, शिवाजीनगर, जुना तोपखाना चौक, येरवडा महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, खडीमशीन चौक कोंढवा, फातिमानगर, गोखलेनगर अशा शहराच्या विविध २४ ठिकाणी घरामध्ये, पार्किंगमध्ये, रस्त्यावर व इतर ठिकाणी पाणी साठल्याच्या घटना घडल्या.

मंगळवारी संध्याकाळी सुरु झालेला पाऊस आज देखील थांबलेला नाही. त्यामुळे कार्यालयात निघालेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कात्रज स्मशानभूमीजवळील नाला दुथडी भरून वाहू लागला

मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज स्मशानभूमीलगत असलेला नाला दुथडी भरून वाहू लागला. त्यामुळे स्मशानभूमीची संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. तर नाल्याशेजारी असलेल्या घरात पाणी शिरले. या ठिकाणी उपस्थित असलेले अग्निशमन विभागाचे कर्मचारी निलेश राजिवडे यांनी त्वरित स्थानिक तरुणांच्या मदतीने रहिवाशांचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. या नाल्यामधून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात मोठी झाडे वाहत जाताना दिसून आली.

कात्रजचा पेशवे तलाव भरून वाहू लागला

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज येथील पेशवे तलाव भरून या तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या तलावाला धबधब्याचे स्वरूप आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.