Pune News: राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पुरुष विभागात यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

एमपीसी न्यूज: यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू यांनी आपली घोडदौड कायम राखत येथे सुरु असलेल्या 11 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत आज या चारही संघांनी आपले वर्चस्व कायम राखले. पण, वर्चस्व राखून खेळणाऱ्या ओडिशाला गोल सरासरीवर आपले आव्हान गमवावे लागले.

स्पर्धेत कर्नाटक, चंदिगड, पंजाब यांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रातील सामन्यात तीन सामन्यातच 33 गोल नोंदले गेले. उत्तर प्रदेश, ओडिशा संघांनी मोठ्या विजयाची नोंद केली. पण, ओडिशाची ही गोल स्पर्धा गोल सरासरीत पाचने कमी पडली.

हॉकी ओडिशाने गोवा संघाला 14- 0 असे हरवले. सुशील धनवर याने सहा गोल करून विजयाच मोठा वाटा उचलला. स्पर्धेतल सर्वात वेगवान हॅटट्रिक नोंदवताा त्याने 5, 6, 9व्या असे चार मिनिटात तीन गोल केले. त्यानंतर त्याने 12व्या मिनिटालाच काही सेकंदाच्या अंतराने दोन गोल केले. उत्तरार्धात त्याने चौथा गोल 45व्या मिनिटाला केला.
दुसऱ्या सामन्यात बंगालने गुजरातचे आव्हान 19-0 असे संपुष्टात आले. अभिषेक प्रताप याने सात गोल केले. बंगालकडून हे सर्वाधित गोल ठरले. अभिषेकने सातही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले.

महाराष्ट्र अपराजित
यजमान महाराष्ट्राने दिवसातल्या अखेरच्या सामन्यात आपला दबदबा कायम राखला. त्यांनी आज बिहारचे आव्हान 5-1 ने मोडून काढत सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आजचे पाचही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले गेले. सामन्याच्या 14व्या मिनिटाला प्रताप शिंदेने पहिला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर त्यांना आघाडी वाढवण्यासाठी थेट उत्तरार्धाची वाट पहावी लागली. त्या दरम्यान, बिहारच्या आक्रमकांनी सातत्याने महाराष्ट्राच्या बचाव फळीची परिक्षा पाहिली. त्यांनीही तीन कॉर्नर मिळविले. पण, महाराष्ट्राच्या बचाव फळीने ते परतवून लावले.

उत्तरार्धात महाराष्ट्राने खेळात वेग आणला. याचा फायदा झाला. बिहारच्या गोलकक्षात मुसंडी मारत त्यांनी एकामागून एक कॉर्नर मिळविले आणि आपले लक्ष्य साधले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मात्र त्यांचा बचाव भेदला गेला. बिहारच्या उदय बाराने हा गोल केला. गटात बरोबरीने चालणाऱ्या या दोन संघातील हा सामना निर्णायक होता. महाराष्ट्राने बाजी मारून 9 गुणांसह बाद फेरी गाठली. बिहार दुसऱ्या स्थानावर राहिले.

सकाळच्या सत्रातील तिसऱ्या उत्तर प्रदेशाने आसामचा 6-0 असा पराभव केला. जी गटात उत्तर प्रदेश संघाने आपले सर्व साखळी सामने जिंकले. त्यांनी 9 गुणांसह अव्वल राहत बाद फेरी गाठली. उत्तर प्रदेशासाठी महंमद अमिर खान, सैफ खान यांनी दोन दोन गोल केले.

दुपारच्या सत्रात झारखंडने केरळाचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. जी गटातील या सामन्यात झारखंडचे सहा, तर केरळाचे ३ गुण झाले. दोन्ही संघ बाद फेरीपासून दूर राहिले.

अ गटातून तमिळनाडूने अखेरच्या सामन्यात हिमाचल प्रदेशाचा 11-0 असा पराभव केला. कार्ति एस. याचे गोल पंचक त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या विजयाने त्यांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला. ते गटात सहा गुणांसह अव्वल आले, तर हिमाचल प्रदेशाला 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

छत्तीसगडने मिझोरामचा 6-1 असा पराभव करून गटात तिसरे स्थान मिळविले.

निकाल –

– गट एफ – ओडिशा 14 (सुशील धनवार 5, 6, 9, 12, 45 वे, मांग्रा भेंग्रा 7, 22 वे, पात्रस तिर्की 2 वे, अभिषेक लाक्रा 28 वे, प्रकाश बार्ला 36 वे, प्रसाद कुजुर 47 वे, बिजू एक्का 58वे, अजय कुमार एक्का 60वे मिनिट) वि.वि. गोवन्स हॉकी ० मध्यंतर 9-0
हॉकी बंगाल – 19 (अभिषेक प्रताप सिंग 2,12, 14, 25, 34, 37, 39 वे , रौशन कुमार 9, 38वे, अवॉय एक्का 16 वे, कुंजन टोपनो 18, 30वे, नितिश नेउपाने 21, 35, 53वे, संजय पासवान 26वे, सौरभ कुमार सिंग 44, तरणवीर सिंग 47, 54 वे मिनिट) वि.वि. हॉकी गुजरात ०. मध्यंतर 10-0

– गट जी – उत्तर प्रदेश 9 (मोहंमद आमीर खान 1 ले, 7 वे, मोहंमद सैफ खान 8, 43वे, रिषभ साहु 21 वे, दीपक पटेल 50 वे मिनिट) वि. वि. आसाम हॉकी ०.
झारखंड 2 (राजेंद्र ओरम 36 वे, संदीप मिंज 52वे मिनिट) वि.वि. केरळा 1 (अजिश रेजी 59 वे) मध्यंतर ०-०

– गट अ – हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू 11 (कार्ती एस. 9, 11, 37, 39, 43वे, सुंदरापंडी 29, 35, 47 वे, पृथ्वी जी एम, 33वे, षण्मुगम पी 42 वे., सिलव्हर स्टॅलिन 53 वे मिनिट) वि.वि. हॉकी हिमाचल प्रदेश ० मध्यंतर 3-0

– गट एच – छत्तीसगड 6 (कार्तिक यादव 1 ले, 35 वे, जनैद अहमद 40 वे, 42 वे,  51 वे, सुखदेव निर्मळकर 45 वे मिनिट) वि.वि. हॉकी मिझोराम 1 ( लार्लेमडिका 29 वे) मध्यंतर 1-1
हॉकी महाराष्ट्र 5 (प्रताप शिंदे 14, 41, 42वे, तिकारा थकुला 37 वे, वेंकटेश केंचे 43 वे मिनिट) वि.वि. हॉकी बिहार 1 (उदय बारा 60 वे मिनिट) मध्यंतर 1-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.