Manobodh by Priya Shende Part 63 : घरी कामधेनू पुढे ताक मागे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 63 (Manobodh by Priya Shende Part 63)

घरी कामधेनू पुढे ताक मागे

हरीबोध सांडूनी विवाद लागे

करी सार चिंतामणी काचखंडे

तया मागता देत आहे उदंडे

समर्थांनी या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 63) वाद-विवाद करणारा कसा मूर्ख असतो, ज्याने त्याच्या हातात काहीच लागत नाही हे सांगितलय. हे सांगताना ते काही उदाहरणे देत आहेत. ते म्हणतात कि अशी माणसं स्वतःकडे घरी कामधेनू असून हा इतरांकडून ताक मागतोय ही किती हास्यास्पद गोष्ट आहे ना! कामधेनु म्हणजे अशी गाय जी तुमच्या सगळ्या कामना, इच्छा पूर्ण करते.

आता असं असताना हा माणूस काहीतरी निरर्थक मागतो. हा माणूस लोकांकडे ताक मागतोय, नाशिवंत आहे. नश्वर आहे. हे आपल्या क्षणिक गरजा भागवतं. तर, माणसाला काय मागावं हे देखील कळत नाही. मागायचं तर परमेश्वर कृपा, त्याची प्राप्ती मागावी.

सतत नामस्मरण घडू देत. भक्ती घडू दे. संत सज्जनाची संगत घडू दे. असं काही मागावं.. ज्याने आपल्या मनाला शांती मिळेल. समाधान मिळेल. सुखानंद मिळेल. आत्म उद्धार होईल. असं मागावं… ते सोडून माणूस तात्पुरत्या सुख सोयी ते पण ऐहिक सुखाच्या मागतो.

Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीची ही वैभवशाली परंपरा निरंतर राहू दे – महेश लांडगे

दुसरे उदाहरण ते चिंतामणीचं देत आहेत. एखाद्याकडे चिंतामणी आहे. चिंतामणी हा, आपण चिंतू ते देणारा आहे किंवा आपल्या चिंता दूर करणारा आहे. तर अशा माणसापाशी जाऊन एखादा माणूस काचेचे तुकडे मागतो. ही किती निरर्थक गोष्ट आहे. हा मूर्खपणाच आहे. किंवा एखाद्याकडे चिंतामणी आहे पण, त्याला त्याचे महत्त्व माहित नाहीये आणि तो काचा समजून फेकून देतो. तर ही पण मूर्खपणाची गोष्ट आहे.

आपल्याकडे काय आहे आणि आपण काय मागतोय याचं तारतम्यं हवं. इथे असं म्हणता येईल की तुज आहे तुजपाशी… सगळं तर तुझ्यातच आहे, पण ते नीट ओळख. तुझं लक्ष भलत्या गोष्टींवर ठेवणं हा मूर्खपणा आहे.

समर्थांना या दोन्ही गोष्टींवरून हेच पटवून द्यायचंय की परमेश्वर प्राप्तीचा बोध घेण्याऐवजी, निरर्थक वाद-विवाद केला तर तेही हास्यास्पद आणि मूर्खपणाचा आहे. म्हणून त्या म्हणतात की हरीबोध सांडूनी विवाद लागे. आपल्याला माहिती आहे की मनुष्य जन्म आहे तिथे मृत्यु अटळच आहे. मग अशा परिस्थितीत जेवढा काळ आपण जगतो, त्यात तरी परमेश्वर भक्ती करावी (Manobodh by Priya Shende Part 63).

त्याच्याशी एकरूप व्हावे, जेणेकरून जन्ममृत्यूच्या फेर्‍याचा त्रास संपेल. पण ते सोडून माणूस भलतीच कर्म करतो. भलंत्याच वादविवादात गुरफटतो. जेवढा वेळ मिळालाय त्यात, एक क्षण पण वाया न घालवता, भगवंत भक्ती केली पाहिजे. आपला पूर्ण वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवला पाहिजे.

हे सगळं खरं असूनही काही मूर्ख लोक मात्र वादविवादात वेळ घालवतात. बरं वाद कशाचा तर परमेश्वराचा अस्तित्व आहे का? मी त्याची भक्ती का करायची? मला त्या पासून काय फायदा? तुम्हाला काही अनुभव आलाय का? तुम्हाला देव भेटला का? मला भेटेल का? असे निरर्थक प्रश्न विचारून वाद-विवाद वाढवायचा. समोरच्या माणसाने कितीही समजावून सांगितलं तरी त्याला निष्कारण प्रश्न विचारून भंडावून सोडायचं. असं केल्याने खरं समाधान कोणालाच मिळत नाही.

भगवंत म्हणजे वस्तू नाही जी सहज डोळ्याला दिसेल. ती समजून घ्यायची, अनुभवायची गोष्ट आहे. त्याचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी अपार श्रद्धा लागते. भगवंत आहे आणि तो चराचरात भरून राहिलेला आहे, ही श्रद्धा जर असेल, तर त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं. आपल्या प्रत्येक कृतीत राम आहे, हे समजायला लागतं.

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती 

 

त्यासाठी मन शुद्ध हवं. म्हणजे भगवंतप्राप्ती करणं सोपं जातं, हाच उपदेश संत करतात आणि तसाच समर्थ पण करत आहेत. परमेश्वर आपल्यातच आहे, तो ओळखायला शिका. त्याला जाणून घ्या. म्हणजे तो तुझं कल्याण करेल. व्यर्थ वाद घालण्याऐवजी श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, असं समर्थ सांगताहेत.

तर आपणही अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने भगवंताला शरण जाऊ या.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.