Marathi TV Serial: तेजस्विनीच्या पाठीवर ‘या’ मालिकेने दिली कायमची खूण

Marathi TV Serial: 'This' Serial has left a permanent mark on Tejaswini's back

एमपीसी न्यूज – असं म्हणतात काही जखमा या वेदनादायक असतात तर काही गुलाबी. चित्रपट किंवा मालिकेच्या शूटिंगदरम्यान काही किस्से, अपघात घडतात जे आयुष्यभर लक्षात राहील, अशी छाप सोडून जातात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बाबतीत एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान अशीच एक वेगळीच घटना घडली. ज्या घटनेने तिच्या पाठीवर कायमची एक खूण दिली.

मात्र तेजस्विनीने हीच खूण वेगळ्या स्वरुपात पाठीवर मिरवत संपूर्ण मालिकेचे शूटिंग पूर्ण केलं. ‘100 डेज’या सस्पेन्स थ्रिलर मालिकेदरम्यान घडलेला किस्सा सांगत तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

‘100 डेज’या मालिकेत तेजस्विनीने आदिनाथ कोठारेसोबत काम केलं होतं. यात ती एका ग्लॅमरस खलनायिकेच्या भूमिकेत होती. या मालिकेचं शीर्षकगीत शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, ‘या शोने मला खूप वेगळा अनुभव दिला. आयुष्यभराची एक खूण पण. हे टायटल साँग शूट करताना माझ्या पाठीत आरसा पडला. पण तुम्हाला माहितच असेल की मी साहसी व लढाऊ प्रवृत्तीची आहे आणि त्या खुणेने मला आणखी सुंदर बनवलं. संपूर्ण मालिकेत मी डीप नेक (deep neck) ब्लाऊज घालून ती खूण मिरवली’.

‘असो, मला या शोने एका वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात नेऊन ठेवलं. मी Antagonist म्हणजेच खलनायिका असून सुद्धा राणी सरदेसाई शेवटच्या क्षणापर्यंत पकडली जाऊ नये, असं प्रेक्षकांना वाटणं हेच त्या पात्राचं यश होतं. आणि यात आव्हानात्मक हिरोईनचा रोल निभावताना माझे मध्यम वयोगटातील पुरुष चाहते होतेच, पण पोलीस कर्मचारी, लहान मुलं, बायका आणि वयोवृद्ध तरुणही चाहते झाले हे आज सांगताना मज्जा वाटते.’

अत्यंत उत्कंठावर्धक असलेल्या या मालिकेचे शीर्षकगीत देखील तितकेच वेधक होते.  शंभर भागांचीच कथा असलेल्या मालिकेत शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणाऱ्या व्यक्तीची आणि त्या रहस्याचा शोध घेणाऱ्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.