Maval: मावळात श्रीरंग बारणे-पार्थ पवार यांच्यात होणार दुरंगी लढत!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळमध्ये युतीचे बारणे आणि आघाडीचे पवार यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. पार्थ यांची पूर्वीच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, आज बारणे यांची अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्याने बारणे आणि पवार यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठ दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना जाहीर झाली. त्यांच्या प्रचाराचा नारळ देखील फुटला आहे. शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत होता. भाजपने या मतदारसंघावर दावा केला होता. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळ मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे नेतृत्वाकडून स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो असफल ठरला. मातोश्रीवरून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर विश्वास दाखवित आज त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुस-यावेळी शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिस-यावेळी भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. त्यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. तर, मावळातून सलग दोनवेळा पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीने यावेळी थेट पवार घराण्यातील उमेदवार दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मावळात थेट पवार घराण्यातील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार असून याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.