Mcoca Pune : ब्रिटीश पालांडे टोळीवर मोकाची कारवाई

एमपीसी न्यूज – विमाननगर परिसरातील सराईत गुन्हेगार ब्रिटीश पालांडे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. ब्रिटीश याला अटक केली आहे. त्याच्या टोळीवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पुणे (Mcoca Pune) पोलिसांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला.

Pune : मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

टोळी प्रमुख अखिल उर्फ ब्रिटीश पालांडे (वय २७, रा. विश्रांतवाडी, पुणे) ओंकार टिंगरे (वय २२), आयुष जाधव (वय २५) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी येरवडा येथील एका हॉटेल चालकाला धमकी देत त्याच्याकडे दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. ‘मला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे म्हणून सांगितले होते ना, मग का नाही दिले, तुम्हाला माहित आहे ना, मी इथला किती मोठा गुंड आहे. आताच्या आता पाच हजार रुपये दे नाहीतर मी तुमचे हॉटेल फोडून टाकेल.

यापुढे हॉटेल चालवायचे असेल तर, मला महिन्याला पैसे द्यायचे’ अशी धमकी ब्रिटीश याने हॉटेल चालकाला दिली होती. हॉटेल मालकाला हाताने मारहाण करुन, त्यांच्या गळयातील चेन जबरदस्तीने ओढून घेतली. पैसे देत नाही ना तर चैन घेऊन जातो असे म्हणत आरोपींनी हॉटेल मधील सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी ब्रिटीश आणि त्याच्या साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

ब्रिटीश पालांडे याने घातक हत्यारांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, नुकसान करुन आगळिक करणे, खंडणी मागणे, बेकायदेशिर अग्निशस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीरपणे प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे व त्याच्या सहाय्याने परिसरात दहशत निर्माण करणे, प्रत्येक गुन्ह्यात नवीन साथीदार सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केले आहेत.

त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत गेल्याने येरवडा पोलिसांनी ब्रिटीश आणि त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.