Moshi news: मोशीतील सफारी पार्कच्या कामाला मिळणार गती; ‘एमटीडीसी’च्या माध्यमातून होणार विकास

उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, राज्यमंत्र्यांची मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखड्यातील मोशीतील सफारी पार्क व मनोरंजन केंद्र या आरक्षणाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) मुंबईत बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. यामुळे सफारी पार्क, मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर , महाव्यवस्थापक आशुतोष सलील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्रमांक 1/207 सफारी पार्क यासह 12 मीटर व 18 मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.

संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मोशीत सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळाली आहे.

याबाबतची माहिती पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तटकरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखडामधील “सफारी पार्क” व “मनोरंजन केंद्र” या आरक्षणाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच माझ्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर, महाव्यवस्थापक आशुतोष सलील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयाकडून आलेल्या पर्यटन संबंधित मनोरंजन प्रकल्प प्रस्तावांवर चर्चा केली. यासोबतच अजून काही नाविण्यपूर्ण पर्यटन उपक्रम तेथे विकसित करता येईल का, याचा विचार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात तिर्थक्षेत्र किंवा आध्यात्मिक पर्यटन विकसित करण्यासंदर्भातही चर्चा झाली. अष्टविनायक मंदिर स्थळांच्या विकासाकडे पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिने कसे पाहता येईल यावर सुद्धा विचारविनिमय करण्यात आला. आदित्य ठाकरे – पर्यटन मंत्री.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.