MPC News Special : रखरखत्या उन्हात हलगर्जीपणा केल्यास होऊ शकतो ‘उष्माघात’

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात (MPC News Special) आला. या सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य रखरखत्या उन्हात तब्बल चार ते पाच तास बसून होते. डोक्यावर तापलेला सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध पडले. तर त्यातील 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. अनेकांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमामुळे अतिशय देखण्या सोहळ्याला गालबोट लागले.

मग अशा वेळी उष्माघात म्हणजे काय, उष्माघात कशामुळे होतो, त्याची लक्षणे, उपचार काय आहेत, असे प्रश्न येतात. उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान वाढल्याने होणारा आजार. यालाच हिट स्ट्रोक, सन स्ट्रोक असेही म्हणतात. सध्या तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दिवसभर प्रचंड ऊन पडत असून रात्रीच्या वेळी पाऊस पडतो आहे. दिवसा देखील अचानक आभाळ भरून येते आणि अक्षरशः गारांचा पाऊस पडू लागतो. पाऊस पडून होताच पुन्हा उन्हाचे चटके सुरु होतात. अवकाळीमुळे ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. अशा वेळी शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते.

उष्माघात होण्याची कारणे – MPC News Special

  • उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
  • जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
  • घट्ट कपड्याचा वापर करणे
  • अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे –

  • थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
  • भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
  • रक्तदाब वाढणे, मानसिक बेचेनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था
  • पुरळ येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे
  • शरीराचे तापमान 106 फॅरेनहाईट पेक्षा अधिक होणे
  • मळमळ, अतिसार, घाम येणे
  • हृदयाचे ठोके जलद होणे, पोट दुखणे

उपचार –

  • उष्माघाताचा त्रास होत असेल तर रुग्णास तातडीने सावलीत न्यावे
  • रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
  • रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
  • रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
  • रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
  • आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे
  • रुग्णाच्या नाडीच्या ठोक्यावर सतत लक्ष ठेवा
  • रुग्णाच्या मानेच्या दोन्ही बाजू, काखा, हाताची मनगटे, पायाच्या घोट्यांवर आईस बॅग्ज किंवा आईस पॅक ठेवा

काय करावे –

  • तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
  • हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
  • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
  • सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
  • पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
  • बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
  • गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
  • रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
  • जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी

काय करु नये –

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
  • दुपारी 12 ते 3.30 कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.

यांनी अधिक काळजी घेण्याची गरज –

अर्भकं, लहान मुले, वृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणारे, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधी यांसाखे आजार असणाऱ्यांना उष्माघात लवकर होतो.

त्यामुळे वरील आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.