MPC News Special : पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार चालणार ‘ऑनलाईन’

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तालयातील कामे जलद (MPC News Special) गतीने व्हावीत, पेंडन्सी राहू नये, तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘ई ऑफिस’ ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार हा ऑनलाइन चालणार आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे हे आयआयटी कानपूर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तंत्रज्ञान आधारित असल्याने तांत्रिक बाबींवर आधारित पोलिसांचे बळकटीकरण करून पोलिसांचा कारभार हा टेक्नोसेव्ही करण्यावर त्यांचा भर असतो.
पोलिसांच्या कामाचा वेळ वाचण्यासाठी तसेच सर्व कामे जलद गतीने होण्यासाठी आयुक्तांनी ई ऑफिस ही संकल्पना सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. त्याचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पुरविण्यात आले आहेत. संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या नावावर किती कामे पडली आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
यासाठी एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक कागदाचे रेकॉर्ड राहणार –
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नावाने आलेले टपाल पोलीस आयुक्त कार्यालयातील बिनतारी विभागात येते. तिथून संबंधित पोलीस ठाण्यांना ते टपाल पाठवले जाते. मात्र आता नव्या प्रणालीनुसार हे टपाल संबंधित पोलीस ठाण्यांना ऑनलाईन माध्यमातून पाठवले जाणार आहे.
पुढील काही दिवस सॉफ्ट कॉपीसह हार्ड कॉपी देखील पोलीस ठाण्यात पाठवल्या जातील. काही दिवसानंतर हार्ड कॉपी न पाठवता केवळ सॉफ्ट कॉपी पाठवल्या जाणार आहेत. नागरिकांचे तक्रार अर्ज आणि इतर कागदपत्रे देखील ऑनलाइन माध्यमातून पोलीस स्टेशन आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली जाणार आहेत. प्रत्येक कागद स्कॅन करून पाठवला जात असल्याने प्रत्येक कागदाचे रेकॉर्ड राहणार आहे.
ई ऑफिस सुरू करण्यात पिंपरी चिंचवड पोलीस तिसरे – MPC News Special
ई ऑफिस ही संकल्पना रत्नागिरी जिल्हा पोलीस या घटकात सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात ई ऑफिस यंत्रणा राबविण्यात आली. ही यंत्रणा राबविणारे पिंपरी चिंचवड पोलीस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पोलीस महासंचालकांच्या हस्ते होणार उद्घाटन –
ई ऑफिस ही प्रणाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.
नागरिकांच्या अर्जांचा जलद निपटारा –
नागरिक आपल्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे अर्जाच्या माध्यमातून मांडतात. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून त्या अर्जांची दखल घेऊन संबंधित पोलीस स्टेशन अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते अर्ज पाठवले जातात. मात्र हे अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागल्याचे प्रकार पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे नागरिकांच्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी ई ऑफिस या यंत्रणेचा भरपूर उपयोग होणार आहे. नागरिकांनी अर्ज दिल्यानंतर तो स्कॅन करून ई ऑफिस या प्रणालीमध्ये टाकला जाईल. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या परवानगीने संबंधित अधिकाऱ्यांकडे तो पाठवला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया कमी कालावधीत होईल.
कुठूनही करता येणार काम –
अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध खटल्यांच्या निमित्ताने न्यायालय, बैठका, बंदोबस्त, इतर कार्यक्रमांना जावे लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सहीसाठी आलेली फाईल तासंतास टेबलवर पडून राहते. मात्र ई ऑफिस या प्रणाली मध्ये अधिकाऱ्यांना कुठल्याही ठिकाणावरून संकेतस्थळावर लॉगिन करून कामकाज करता येणार आहे. त्यामुळे आयुक्तालयातील कामाचा उरक वाढणार आहे.
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आढळला पानांवर अक्षरे उमटणारा गुप्त संदेश वाहक सीतापत्र वृक्ष