Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आढळला पानांवर अक्षरे उमटणारा गुप्त संदेश वाहक सीतापत्र वृक्ष

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad) वनस्पती अभ्यासक प्रा.किशोर सस्ते यांना मोशी येथे दहीपळस नावाचा एक संकटग्रस्त वृक्ष सापडला असून त्यांच्या पानांवर कोणत्याही टोकदार किंवा टणक वस्तूने लिहिले असता, कधीही लुप्त न होणारी कायमस्वरूपी अक्षरे उमटतात. या वृक्षास दधीपर्ण, दहीमन, दहीपळस किंवा दहीपलाश असे देखील म्हणतात.

या वृक्षाच्या पानांवर सीतामाई रामाला संदेश लिहीत असे म्हणून यास सीतापत्र असे देखील म्हणतात. याचे वानसशास्त्रीय नाव कॉर्डिया म्कलिओडी असून तो भोकरवर्गीय बोरॅजीनेसी या कुळातील आहे. हा वृक्ष आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच आय यु सी एन रेड लिस्टच्या संकटग्रस्त यादीमध्ये समाविष्ट आहे.

भारतात हा वृक्ष राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड येथे आढळतो. प्रा. सस्ते यांनी पुणे जिल्ह्यातील भामचंद्र, घोराडेश्वर आणि भंडारा डोंगररांगामधून देखील या वृक्षाची नोंद केलेली आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये या पानांचा उल्लेख भुमिगत क्रांतिकारक गुप्त संदेश पाठवण्यासाठी करत असत. या झाडांच्या पानांमार्फत संदेशवहन केले जाते असा सुगावा इंग्रजांना लागताच त्यांनी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले असे म्हटले जाते. हा वृक्ष कर्करोग, पॅरालिसीस(पक्षाघात) या आजारावर उपयुक्त आहे.

या वृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये किंवा झाडाखाली दुध ठेवल्यास त्याचे दही होते आणि यांची पाने पळसासारखी आहे, म्हणून यास दहीपळस म्हणतात. मद्यपानाची नशा उतरण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. हा वृक्ष कावीळ आणि उच्च रक्तदाब यावर देखील उपयुक्त आहे.

मोशी येथील खाणकाम परिसरातील टेकड्यांवर हा वृक्ष आढळला आहे. या आधी याच परिसरातून दहिपळसाचे मोठे झाड नामशेष झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील हा एकमेव दुर्मिळ (Pimpri Chinchwad) असा वृक्ष आहे. 2019 साली एका खासगी कंपनीने पिंपरी चिंचवड परिसरातील जैवविविधतता अंतर्गत विविध वृक्षांची नोंद केली आहे. परंतु, या यादीमध्ये येथील अनेक दुर्मिळ वनस्पतींची नोंदच केली गेलेली नाही.

विकास कामे, खाणकाम आणि टेकड्यांची तोडफोड यामुळे या वृक्षांवर वरवंटा आलेला आहे. या वृक्षाचे भविष्यात संगोपन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे, असे वनस्पती आणि जैवविविधता तज्ञ प्रा. किशोर सस्ते म्हणाले.

Talegaon Dabhade : डॉक्टर म्हणजे साक्षात देवाचे रूप – दीपक फल्ले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.