‘हॉटेल मुंबई’, 26/11 च्या त्या भयाण रात्रीचा पुनरानुभव

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- काही अतिरेकी मुंबई नगरीत दाखल होतात आणि या शहरात असलेली शांतता अन असलेला मानवी ठेहेराव पूर्णतः उध्वस्त करुन जातात. शत्रुराष्ट्रात बसलेले आत्यांध द्बेषाने भारलेले ते आकां, काही प्याद्यांना हाताशी धरुन संपूर्ण जगालाच वेठीला धरायला बघतात. होय ! संपूर्ण जगच त्या ताज हॉटेलात,  अन इतर ठिकाणी बंदिस्त अन अस्वस्थ झालेले होते. ‘हॉटेल मुंबई’ या नव्या चित्रपटात दाखवलेले आहे.

अत्यंत सूक्ष्मपणे केलेले चित्रण, त्यात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि बाहेरच्या लोकांनी दाखवलेली समयसुचकता, अतिरेक्यांची क्रूरता हे सर्व खूप प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. अतिरेक्यांची ती क्रुरता पाहुन खरच प्रश्न पडतो की, का? कशासाठी हा अट्हास ? काय मिळालं?

घटना काय घडली हे वाचकांना सांगण्याची गरज नाही. मात्र ही घटना सादर करताना दिग्दर्शकाने आपले कौशल्य पणाला लावले आहे. या सिनेमात देव पटेल याने साकारलेली व्यक्तीरेखा लक्ष वेधून घेते. अत्यंत गरीब परिस्थितीतुन पुढे येऊन त्या अलिशान हाॅटेलात सर्वस्व झोकुन केलेलं काम आणि समयसूचकता दाखवून शेवटी अडकलेल्या लोकांना बाहेर सुखरुप आणण्याचं समाधान आणि सगळ्यात शेवटी आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा आनंद त्याने अफाट आणि संयतपणे दाखवला आहे.

अनुपम खेर यांनी साकारलेला मॅनेजर माणसातल्या ममत्वाची आणि कर्तृत्वाची सांगड अत्यंत चपखलपणे साधतो. त्यांचा वावर त्या वातावरणात अत्यंत सुंदर झाला आहे. अभिनेत्री नझनिन बोनिआदी हिने आपल्या स्वकीयांविषयीची तळमळ अतिशय सुंदर दाखवली आहे. आर्मी हॅमर याचा ही वावर प्रेक्षकांशी आपुलकी दाखवणारा आहे.

हा वास्तववादी चित्रपट दिग्दर्शित केला आहे, सुप्रसिध्द दिग्दर्शक अँन्थनी मरास यांनी ,तर हा चित्रपट लिहिला आहे लेखक जाॅन कँली आणि मरास यांनी. ही निर्मिती ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत यांची संयुक्त निर्मिती आहे. 17 मिलियन अमेरिकी डाॅलर्स इतका खर्च या चित्रपटावर करण्यात आला आहे. उच्च निर्मिती, कलात्मक मूल्यांमुळे हा खर्च सार्थकी लागला आहे. चित्रपट आवर्जुन पाहाण्यासारखा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.