Mumbai  : पाहा, पैठणीची मनाला भिडणारी  हृदयस्पर्शी गोष्ट

एमपीसी न्यूज  : मनाशी स्वप्ने बाळगून आयुष्य व्यतीत करणा-या एका तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

दिवंगत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची ‘पैठणी’ या नावाची एक नितांतसुंदर कविता आहे. तरुण पिढीला ही कविता माहिती नसेल. पण यात त्यांनी आपल्या आयुष्यातील काही स्वप्नांची गुंफण केली आहे. पैठणी हे महाराष्ट्रीयन स्त्रीचे  स्वप्न असते. तिला महावस्त्र असे मानले जाते.

प्रत्येक जण काही ना काही स्वप्न उराशी बाळगून आयुष्य जगत असतो.  यात काही स्वप्नं ही साधी सोपी असतात, तर काही स्वप्नं ही कठीण परीक्षा घेणारी असतात. त्यामुळे काहींची स्वप्न सहज पूर्ण होतात. तर काहींना मात्र प्रचंड कष्ट करावे लागतात.

यात अनेकांची ही स्वप्न ही अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण अशा  निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा..

पैठणीतील प्रत्येक धागा हा त्या स्त्रीचे एक स्वप्न असते. कधी ते पूर्ण होते तर कधी अपूर्ण राहते.  असंच एक स्वप्न, इच्छा या चित्रपटातील अभिनेत्रीची आहे. त्यामुळे प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ती तिची लहानशी स्वप्नं व्यक्त करताना दिसून येत आहे.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करत असून चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार झळकणार असून अद्यापही काही नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

शंतनू गणेश रोडे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं कथालेखनही त्यांनीच केलं आहे. तर अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे निर्मिती करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.