Mumbai News : भोसरी MIDC भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे.

रात्री गिरीश चौधरी यांची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा दणका मानला जात आहे.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा हेमंत गवंडे केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.