Mumbai : रिअल हिरोंनी कोरोना जनजागृतीसाठी तयार केलं ‘मिलकर लढ़ना है हमे’ हे गाणं

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, तो रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, शेतकरी असे अनेक रिअल हिरो कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील जीवाची बाजी लावून आपापले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. अश्यातच सर्व रिअल हिरोंनी एकत्र येऊन “मिलकर लढ़ना है हमे” हे गीत रसिकांसमोर आणलं आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सागर घोरपडे यांनी गायलेल्या या गीताला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गाण्यात कोलकाताचे पोलीस उपायुक्त अंगशुमन साहा, सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, सोलापूरचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पुणे क्राईम ब्रांच चे स.पोलीस आयुक्त विजय चौधरी, लातूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक वैशाली माळी, पुणे पोलीस सागर घोरपडे यांचा सहभाग आहे.

याशिवाय न्यूज रिपोर्टर वैभव बलकुंदे, वैद्यकीय कर्मचारी जगदीश त्रिवेदी, सुषमा त्रिवेदी, दत्ता गायकवाड, प्रशांत लबडे पाटील, एमएसईबी कर्मचारी सिमरन व्यास, फार्मसिस्ट प्रीती व्यास, शेतकरी जयशंकर पाटील, धीरज जाधव, बँक मॅनेजर अजय यादव हे रिअल हिरो स्क्रीनवर दिसून येत आहेत.

अमोल नाशिककर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे तर गीतकार अमोल नाशिककर व अजय यादव हे आहेत. हे गाणं सागर घोरपडे व अमिता घुगरी यांनी गायलं आहे. गाण्याचे दिग्दर्शन अविराज जयशंकर यांनी केले असून संकल्पना अदिती त्रिवेदी यांची आहे. संकलन व पोस्टर अनिल शिंदे यांनी केले आहे.

लोकांनी घरी राहून या संकटाशी सामना केला पाहिजे. आज ते सुरक्षित राहावे यासाठीच सर्व प्रशासन काम करते आहे. पोलीस कठोर कारवाई करताना दिसतात, यामागे सर्व सुरक्षित राहावे हीच भावना आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केले तरच या संकटाशी दोन हात करता येणे शक्य असल्याची भावना सागर घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.