Pune : शहरात एका तृतीय पंथियासह 11 मृत्यू; नवे 202 रुग्ण, 68 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज – महापालिकेचा कोरोना संदर्भातील आजचा ( शनिवार) दैनंदिन अहवाल काळजी वाढविणारा आहे. कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 202  झाली आहे. तर 11  जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका तृतीय पंथीयाचा समावेश आहे. त्यामुळे शहरात तृतीय पंथीयाचा हा पहिला मृत्यू ठरला आहे.

दरम्यान, कोरोनावर मात करून 68  रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून असलेल्या क्रिटिकल रुग्णांची संख्या 149  आहे. त्यातील 41  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 3,395  आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,412,  एकूण मृत्यू 185  झाले आहेत. आजपर्यंत एकूण 1,698  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर स्वॅब तपासणी 1,205  रुग्णांची करण्यात आली आहे.

11 मृतांमध्ये एका तृतीय पंथीयाचा  समावेश 

शहरात आज एकूण 11  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये एका तृतीय पंथीयाचा समावेश होता. हा रुग्ण भवानी पेठेत राहणारा होता. तसेच त्याचे वय 46  वर्ष होते. त्याला कोरोनासह अन्य गंभीर आजार होते. दरम्यान, शहरातील तृतीय पंथीयाचा हा पहिला मृत्यू ठरला आहे.

ससूनमध्ये आज चौघांचा मृत्यू

पुणे शहरातील ससून रुग्णांलयात आज ( शनिवारी ) आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णालयात आजपर्यंत कोरोनामुळे एकूण 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना आजारातून ठणठणीत बरे झालेल्या दोन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे आजपर्यंत कोरोनमुक्त झालेल्या एकूण 111 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, ससून रुग्णांलयात आज नव्या सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.