Washington: भारताला व्हेंटिलेटर्स देऊन अमेरिका करणार ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन’ गोळ्यांच्या मदतीची परतफेड

Washington: US to repay aid to 'hydroxychloroquine' pills by providing ventilators to India

एमपीसी न्यूज – कोविड-19 जागतिक महामारीच्या संकटाशी लढण्यासाठी अमेरिका भारताला देणगी स्वरूपात व्हेंटिलेटर्सची मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा निर्णय ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे जाहीर केला. भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन गोळ्यांचा पुरवठा केला होता. भारताला व्हेंटिलेटर्स देऊन अमेरिका त्याची परतफेड करणार आहे.

हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन गोळ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीची भाषा वापरून समस्त भारतीयांची नाराजी ओढवून घेतली होती. नंतर नेहमीप्रमाणे आपण गमतीने म्हणाल्याची सारावासारव त्यांनी केली होती. अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन गोळ्यांची मदत केल्याबद्दल काही विरोधकांनी त्यावेळी टीका देखील केली होती, अमेरिकेने भारताला काय मदत केली, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. त्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळणार आहे.

ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आमच्या भारतातील मित्रांना अमेरिका व्हेंटिलेटर्सची देणगी देणार आहे, हे जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे. या जागतिक महामारीच्या संकटात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहोत. कोरोनावरील लस विकासित करण्यासाठी देखील आपण सहकार्य करीत आहोत. आपण एकत्रितपणे अदृश्य शत्रूचा पराभव करु!

ट्रम्प यांच्या या ट्वीटला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे.  या जागतिक महामारीशी आपण सर्वजण एकत्रितपणे लढा देत आहोत. अशा प्रसंगी  सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे कार्य करणे आणि आपल्या जगास स्वस्थ आणि कोविड-19 पासून मुक्त करण्यासाठी शक्य ते सर्व करणे नेहमीच महत्वाचे असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.