Blog: योद्धा परिचारिका

Senior Journalist Rajan Wadke's Blog on the occasion of world nurses day: Warier Nurses

एमपीसी न्यूज – आधुनिक शु्श्रूषा शास्त्राच्या संस्थापिका समजल्या जाणाऱ्या आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस. सन 1853-54 मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना नाइटिंगेल या मलमपट्टी करत फिरत होत्या. त्यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज त्यांची 200 वी जयंती. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठीच्या लढ्यात सध्या डॉक्टरांबरोबर लाखो परिचारिकां  जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची रात्रंदिवस सेवा करत आहेत. जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याला वंदन….

कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत जगभरात आतापर्यंत 2 लख 87 हजार 332 लोकांचा बळी गेला आहे. तर 42 लाख 55 हजार 954  इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर लाखो लोक संशयित रुग्ण आहेत. त्यातील अनेक जण गंभीर आहेतचीनमधून या विषाणूचा प्रसार झाल्यापासून जगभरातील लाखो लोक कोरोनाबाधित झाले. 

लॉकडाऊनमुळे अमेरिकेसारख्या महासत्तेसह बहुतेक सर्व देशांचा आर्थिक क्षेत्राचा कणा मोडला. सर्वच पातळ्यांवर वाताहत झाली. त्या त्या देशांतील सत्ताधारी, नोकरशाही, लोकप्रतिनिधी, पोलिस, डॉक्टर्स आदी सर्वच जण कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. यात पोलिस आणि डॉक्टरांबरोबर लाखो परिचारिकांचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा आहे. या लढ्यात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या या परिचारिका योद्ध्याची भूमिका बजावत आहेत.

अन्य देशांप्रमाणेच भारतालाही कोरोनाने घेरले आहे. आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 71 हजार 365 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 2 हजार 303 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांबरोबर, शाळा, महाविद्यालये, अनेक सरकारी कार्यालये, हॉटेल्स, स्टेडिअम यांना रुग्णालयांचे स्वरूप आल्याचे दृष्य आहे. या भयचकित करणाऱ्या वातावरणात डॉक्टरांबरोबर खांद्याला खांदा लावून परिचारिका कार्यरत आहेत.

येणाऱ्या प्रत्येक रुग्णामुळे संसर्गाची भिती असताना अत्यंत तणावाखाली 24 बाय 7 नव्हे तर 24 बाय 15 अशा पद्धतीने रुग्णसेवेत मग्न आहेत. घरापेक्षा त्यांना या रुग्णांची अधिक काळजी घ्यावी  लागत आहे. त्या सलग किती तास काम करतात, त्यांना आराम करायला वेळ मिळतो का, चहा, न्याहरी, जेवण घेता येतेय का, या प्रश्नांची उत्तरे त्यांनाच माहिती. अत्यावश्यक सेवेमुळे रुग्णसेवेशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नाही. काही डॉक्टर, परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार घडले. त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले.

अशा महामारीच्या परिस्थितीत रुग्णांची सुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांची धावपळ, सेवावृत्ती पाहिल्यावर प्रश्न पडतो तो त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेचा. त्यासाठी काळजी घेतली जात असेलही, सरकारने विमा संरक्षणासारखे काही निर्णयही जाहीर केले आहेत. मात्र, ते सर्व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेतलेले हे तात्पुरते निर्णय आहेत.

इतरवेळी आयुष्यभर रुग्णांच्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या परिचारिकांच्या भवितव्याची चिंता मिटवण्यासाठी सरकारने कायमस्वरुपी काही व्यवस्था केली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. याचेही उत्तर परिचारिकांना माहिती नाही. पण त्या धावताहेत, रुग्णांना धीर देताहेत. जमलं तर मोबाइलवर आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनाही धीर देत आहेत. वेळ मिळाला तर जमिनीवर किंवा खुर्चीवर बसल्याबसल्या थोडीशी विश्रांती घेत आहेत. जागरणाने डोळे लाल झालेत, थकवा आलाय पण नवीन रुग्ण येताच त्यावर तातडीने उपचारासाठी डॉक्टरांबरोबर सज्ज राहात आहेत.

सलग 15 ते 20 दिवस काम करून एक-दोन दिवसांसाठी घरी जाणाऱ्या या रुग्णसेविकांचे औक्षण करून, फुले उधळून स्वागतही करण्यात येत आहे. यामुळे त्या सुखावतही असतील, पण रुग्णशय्येवर असलेल्यांची आयुष्यभर सेवा करणाऱ्या परिचारिकांसाठी केवळ हे स्वागत पुरेसे नाही. कोरोनाच्या संकटाच्या निमित्ताने रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या परिचारिकांचा सरकारने कायमस्वरुपी उचित सन्मान केला पाहिजे.

जखमी सैनिकांची सेवा करणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल्स यांचे कार्य महान आहेच. मात्र, कोरोनाला हरवण्यासाठी सध्या योद्ध्याची भूमिका बजावत असलेल्या जगभरातील परिचारिकांचे कामही तितकेच वंदनीय आहे.

 

– राजन वडके, ज्येष्ठ पत्रकार

 
‘डरना नही है, काम करते रहना है, कोरोना को भगाना है’
कोरोनाबाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी गेल्या २७ मार्च रोजी पुण्यातील नायडू रुग्णालयातील ज्येष्ठ नर्स छाया यांच्याशी संवाद साधला होता. त्यात  पंतप्रधान मोदी यांनी विचारलेल्या आप इतने दिनोंसे सेवा कर रही हो और पुरे अस्पतालको कोरोना व्हायरसके लिए आपने समर्पित कर दिया है. देशभरमें नर्सिंग क्षेत्र में जो बहने काम कर रही है, तो उनके लिए आपका क्या संदेश है?
या प्रश्नाला नर्स छाया यांनी दिलेले उत्तर अतीशय प्रेरणादायी आहे. छाया म्हणतात, ‘उन सबसे मैं यही कहुंगी, डरना नही, काम करते रहना है और कोरोना जैसी बिमारी को भगाना है. देश को जिताना है, यही हर हॉस्पिटल का ब्रिदवाक्य चाहिए.’
छाया यांच्या आवाहनातून खर तर प्रत्येक परिचारिकेच्या मनातील भावना व्यक्त झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like