Pimpri : महापालिका आयुक्तांची लवकरच बदली?, रुबल अग्रवाल यांची वर्णी लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे विरोधकांच्या या ‘शेलक्या’ विशेषणांमुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागाचे आरोप झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची लवकरच बदली होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी काही सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. दुस-या टप्यात आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली निश्चित असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांची पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारने  खातेवाटपानंतर आता सनदी अधिका-यांच्या बदल्या सुरु केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अत्यंत विश्वासू असलेले आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाठविलेले श्रावण हर्डीकर यांची देखील बदली लवकरच होणार आहे. हर्डीकर हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची आयुक्तांवर खप्पामर्जी आहे. तसेच शिवसेना देखील आयुक्तांच्या कार्यपद्धविषयी प्रचंड नाराज असून त्यांनी देखील बदलीची मागणी लावून धरली आहे.

हर्डीकर यांच्या राजवटीत सर्वाधिक गडबड घोटाळे झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांच्याकडून पक्षपातीपणा केला जात आहे. त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली गेली. ते भाजपधार्जिणे असल्याची राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी सातत्याने केली आहे. गेल्या पावणेतीन वर्षात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहे. आयुक्तांकडून अनेकदा सत्ताधा-यांना अनुकूल अशी भूमिका घेतली जाते. त्यामुळेच ते विरोधकांच्या रडारवर आहेत. महाविकासआघाडीच्या सरकाराने अधिका-यांच्या बदल्या सुरु केल्या आहेत. दुस-या टप्प्यात आयुक्त हर्डीकर यांची बदली जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांची पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.