New Delhi : IPL दुबईमध्ये खेळवले जाऊ शकतं ; विराट कोहलीने अतुल वासन यांच्याकडे व्यक्त केली शक्यता

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांने या वर्षीचा IPL सीझन दुबईमध्ये खेळवला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  माजी भारतीय क्रिकेटपटू अतुल वासन यांच्याबरोबर चर्चेदरम्यान त्याने ही शक्यता बोलून दाखवली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू अतुल वासन म्हणाले की, माझी भारतीय संघातील विराट कोहलीसह इतर खेळाडू बरोबर चर्चा झाली आणि सर्वांनीच सप्टेंबर महिन्यात यावर्षीचा  IPL सीझन खेळवला जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.

वासन पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर IPL दुबई सारख्या शहरात भरवणे योग्य राहील. जेणेकरून खेळाडूंना मैदानावर ये – जा करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि शहरातील उपलब्ध सुविधा पाहता संक्रमणाचा धोका सुद्धा कमी राहील.

वासन यांच्या मते प्रत्येक सामन्यासाठी जर शहरातून खेळाडू ये -जा करत राहिल्यास खेळाडू आणि नागरिकांना संक्रमणाचा धोका अधिक निर्माण होऊ शकतो. दुबईमध्ये   IPL सीझन भरवला तर मैदान ते मैदान अंतर कमी असल्याने खेळाडूंना प्रवास करण्यास मोठा पल्ला पार करावा लागणार नाही. त्यामुळे  IPL दुबई मध्ये खेळवणे योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रणजी ट्रॉफी बद्दल बोलताना वासन म्हणाले, यावर्षी घरगुती क्रिकेट सामने खेळवले जाऊ शकतात असे मला वाटत नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफी सुद्धा होण्याची शक्यता सुद्धा धूसर आहे.

खेळाडूंना प्रवास करण्यास परवानगी मिळणे तसेच खर्चाचे नियोजन पाहता हे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. IPL बाबत भारतीय खेळाडू यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सुद्धा वेळोवेळी शक्यता बोलून दाखवली आहे, पण कोरोना वैश्विक महामारीचे संकट पाहता येणारा काळचं ठरवेल की ही स्पर्धा होईल किंवा नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.