Nigadi : संगीत ही कला एकाग्रता शिकवते -ज्येष्ठ शास्त्रीय गायिका वर्षा भावे

एमपीसी न्यूज – “संगीत ही कला एकाग्रता शिकवते आणि त्यातून विद्यार्थी सर्वांगीण विकसित होऊ शकतो,”असे मत ज्येष्ठ शास्त्रीयगायिका, समुपदेशक वर्षा भावे यांनी निगडी येथे व्यक्त केले.निगडीतील मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी आयोजित राज्यस्तरीय समूहगायन आणि अन्य स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून वर्षा भावे बोलत होत्या.

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिया, कार्यवाह यशवंत लिमये, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, ज्ञानप्रबोधिनी – निगडीचे प्राचार्य सुभाष गदादे, यांची व्यासपीठावर तसेच ज्ञानप्रबोधिनी – निगडी केंद्रप्रमुख डॉ.वा.ना. अभ्यंकर आदी उपस्थित होते.

  • समूहात काम करताना क्षमता संवर्धन व्हावे, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून बल संवर्धन आणि विद्यार्थिदशेत मुलांवर श्रम संस्कार रुजावेत अशी उद्दिष्टे ठेवून मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी विद्यार्थी समूहगान, अध्यापक समूहगान, सूर्यनमस्कार आणि श्रमदान या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करीत असते.

कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे अशा सहा विभागांतून शहाण्णव शाळांमधील सुमारे वीस हजार विद्यार्थी आणि अध्यापक या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते; तसेच संपूर्ण गीता पाठांतर या उपक्रमात विविध वयोगटातील पंधरा महिलांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते खालीलप्रमाणे :

विद्यार्थी समूहगान :– मराठवाडा केशवराज विद्यालय, लातूर, विदर्भ बच्छराज विद्यालय, नागपूर पुणे सरस्वती विद्यालय, तळेगाव कोकण श्रद्धानंद विद्यालय, पैंगीण(गोवा) उत्तर महाराष्ट्र ध्रुव अकादमी, संगमनेर. पश्चिम महाराष्ट्र ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर, सोलापूर. अध्यापक समूहगान :-मराठवाडा छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी. विदर्भ बच्छराज विद्यालय, नागपूर. पुणे महिलाश्रम, पुणे कोकण भाऊसाहेब परांजपे विद्यालय, अंबरनाथ (ठाणे) उत्तर महाराष्ट्र ध्रुव अकादमी, संगमनेर पश्चिम महाराष्ट्र (कोणीही नाही). सूर्यनमस्कार :- मराठवाडा छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी, विदर्भ (कोणीही नाही) पुणे जनहित प्रतिष्ठान, बारामती, कोकण बाबासाहेब नानल गुरुकुल, रत्नागिरी उत्तर महाराष्ट्र बालक मंदिर, नाशिक पश्चिम महाराष्ट्र विठामाता विद्यालय, कराड श्रमदान :- ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम) मान्यवरांच्या हस्ते विजेते, संस्कृत उतारा आणि गीता पाठांतर करणारे विद्यार्थी तसेच महिला आणि परीक्षक यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सातत्याने सव्वीस वर्षे अध्यापक आणि विद्यार्थी समूहगान स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या महिलाश्रम, पुणे येथील मार्गदर्शिका संजीवनी कर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

  • भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे सहकार्यवाह आदित्य शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “सत्तावीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाला महाराष्ट्रातल्या विविध भागांतून वाढता प्रतिसाद मिळतो आहे. उत्तम संगीत निर्माण करणाऱ्या शाळांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असावे, असा विश्वास वाटतो. या निमित्ताने शाळांमध्ये समूहशक्तीचा जागर होत आहे; तसेच या उपक्रमामुळे अनेक शाळांशी जोडले जाऊन आम्ही समृद्ध झालो आहोत!” अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी वर्षा भावे म्हणाल्या, “संगीताचे स्वर हे हवेत असतात आणि ते कंठगत करणे हे खूप कठीण, आव्हानात्मक असते. समूहगायनातून अनेक व्यक्तींचे अभिन्नत्व निर्माण होते. शाळेमध्ये संगीतशिक्षक हा महत्त्वाचा घटक असून तो दुर्लक्षित होता कामा नये. अलंकारांनी युक्त असलेले गाणे माणसाला परिपूर्तीकडे घेऊन जाते म्हणून गाणे ही आयुष्यभर शिकण्याची गोष्ट आहे.

  • कार्यक्रमाच्या संयोजनात श्रीकृष्ण अभ्यंकर, नारायण देशपांडे, शीतल कापशीकर, नितीन सावंत यांनी परिश्रम घेतले. अश्विनी इनामदार आणि राकेश राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत लिमये यांनी आभार मानले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.