Nigdi: राष्ट्रध्वजप्रकरणी चौकशी करणार; दोषींवर कारवाई

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प उद्यान येथे उभारलेल्या राष्ट्रध्वज स्तंभप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

निगडीतील राष्ट्रध्वज गेल्या अनेक दिवसांपासून फडकविला जात नाही. याबाबत विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले की, ध्वजस्तंभासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. स्तंभ उभारल्यानंतर निर्माण होणार्‍या अडचणींची माहिती घेऊन स्तंभ उभारला आहे का, यांची माहिती घेतली जात आहे.

वार्‍यामुळे ध्वज फाटत असल्याने तो काढून ठेवला आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि आदर राखण्यासाठी ध्वज काढला आहे. राष्ट्रीय दिनाच्या दिवशी ध्वजारोहण केले जाईल. या संपूर्ण कामाची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रध्वजाबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या संपुर्ण कामाची माहिती घेण्यात आली आहे.

काम करणारी ठेकेदारी संस्था व कामाचे नियोजन करणारे संबधित अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कामात काही त्रुटी राहिल्या आहेत का हे तपासले जात आहे. वारा आणि इतर तांत्रिक बाबी तपासून स्तंभ उभारले जाणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले का, हे तपासले जात आहेत. चौकशीत काही चुका आढळ्यास संबधित दोषींवर कारवाई केली जाईल. योग्य दर्जाच्या कापडासाठी कापड उत्पादन कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. योग्य कापड मिळाल्यास त्यानुसार ध्वज निर्माण केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.