Nigdi : राष्ट्राचे सदैव चिंतन करणारा धगधगता अग्निकुंड म्हणजे सावरकर – राजेंद्र घावटे

एमपीसी न्यूज- क्रांतिकारकांचे महामेरू असणाऱ्या सावकारांचे आयुष्य म्हणजे निष्ठांचे अढळरुप होते. त्यांचे चरित्र म्हणजे स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्व, समाजनिष्ठा, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिनिष्ठा यांचे अलौकिक मिश्रण होते. सावरकर म्हणजे काळाच्या पुढची पावले ओळखणारे असामान्य व्यक्तिमत्व होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला. शब्द, शस्त्र आणि लेखणी यांचा परिणामकारक वापर त्यांनी केला. सावरकर म्हणजे वाणीने आणि विचाराने राष्ट्राचे सदैव चिंतन करणारे धगधगते अग्निकुंड होते, असे मत ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी व्यक्त केले.

निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी स्वातंत्र्यसूर्य सावरकर या विषयावर गुंफले. यावेळी विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, नाराण बहिरवाडे, रविकांत कळंबकर, संजय कुलकर्णी, भास्कर रिकामे, मनेश म्हस्के, विनीत दाते आदी उपस्थित होते.

राजेंद्र घावटे म्हणाले, “स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे सावरकर अजूनही लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचू दिले जात नाही. सशस्त्र क्रांती यशस्वी करण्यासाठी क्रांतीकारकांना त्यांनी मदत केली. सावरकरांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते.त्यांच्या “१८५७ चे स्वातंत्र्य समर ” या पुस्तकावर ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी आणली होती. प्रकाशनापूर्वीच बंदी आणले गेलेले ते जगाच्या इतिहासातील एकमेव पुस्तक आहे. त्याची गीते आजही स्फूर्तीदायक आहेत. हिंदू धर्माचे व्यापक संघटन करताना त्यांनी जातीयता ही समाजाला लागलेली कीड आहे असे सांगितले. पारंपारिक रोटीबंदी, वेदबंदी, बेटीबंदी, समुद्रबंदी आदी सात बेड्या म्हणजे वेडगळ समजुती असल्याचे सांगत, त्या तोडून टाकण्याचा त्यांनी आग्रह धरला. अंदमानात असताना कैद्यांचे शुद्धीकरण केले. दोन जन्मठेपेची शिक्षा झालेले सावरकर हे जगातील एकमेव स्वातंत्र्य योद्धे होते. शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि चापेकरांच्या बलिदानाने त्यांना स्फूर्ती मिळाली. आपल्या वाटचालीत सदैव शिवनितीचा त्यांनी अवलंब केला. आचरणात आत्मचिकित्सा करण्याला ते प्राधान्य देत. आपले आयुष्य स्वातंत्र्यासाठी त्यांनी अर्पण केले. काही लोक सावरकरांवर टीका करतात . परंतु त्यांनी आधी सावरकरांनी अंदमान येथे भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा आठवावी. विपुल साहित्यनिर्मिती करणारे सावरकर एक महान साहित्यिक आहेत. ते मराठी मधील महाकवी आहेत. त्यांचे काव्य आजही वीरश्री निर्माण करतात आणि राष्ट्रभक्ती जागृत करतात” असे राजेंद्र घावटे म्हणाले.

“सावरकरांचे विचार हे राष्ट्रनिर्मितीसाठी सदैव प्रेरणादायी ठरतील असेच आहेत. महान तत्त्वचिंतक अशा त्यांच्या विचारांचे अवलोकन होणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. द्रष्टे राष्ट्राभिमानी, हिंदू संघटक, सिद्धहस्त लेखक, महान कवी, अमोघ वक्ते, प्रखर विज्ञानवादी अशा विविध अंगांनी सावरकर चरित्राचा अभ्यास झाला पाहिजे” असे घावटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शेंडबाळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. आभार भास्कर रिकामे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.