Wakad : कोयत्याने वार करत टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून हॉकीस्टिकने मारहाण करत तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास थेरगाव फाटा येथे घडली.

अजय तुकाराम खांडेकर (वय 26, रा. थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी अजय त्याचे मित्र इंद्रजीत माने, महेश कुंभारकर, किरण गोरे, कार्तिक अटक, प्रथमेश किरण येवले यांच्याशी थेरगाव फाटा येथे लक्ष्मी ट्रेडर्स समोर सार्वजनिक रस्त्यावर गप्पा मारत बसला होता. त्यावेळी अज्ञात आठ ते नऊ जण चार दुचाकीवरून आले. त्यांनी अजय आणि त्याच्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. सर्व मित्र जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यावेळी अजय आरोपींच्या तावडीत सापडला. आरोपींनी अजयवर लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये अजयच्या डोक्यात हातावर आणि शरीरावर अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. आरोपींनी अजयला हॉकी स्टिकने मारहाण केली. घटनेनंतर आरोपींनी दुचाकीवरून पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बांगर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.