Pune News : यंदा लोहगडावर होणाऱ्या उरुसाला परवानगी नाही, लोहगड किल्ला परिसरात कलम 144 लागू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला हा ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे. (Pune News) दरम्यान दरवर्षी लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशा वाली बाबा यांचा उरूस असतो. यावर्षी मात्र या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

मावळ तालुक्यातील अनेक संघटनांनी लोहगड किल्ल्यावरील उरूस साजरा होऊ नये यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात लोहगडावरील दर्गा व मजारी यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने ही अनधिकृत बांधकामे काढावे, तसेच हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी उरुसाचा वापर केला जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे लोहगडावर पुरुष होऊ दिला जाणार नाही. प्रसंगी मोठे आंदोलन उभारू असा इशाराही बजरंग दल आणि इतर संघटनांनी दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व विभागाने ही लोहगडावर उरुसाला परवानगी नाकारली असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 5 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत लोहगड आणि घेरेवाडी परिसरात कलम 144 आदेश लागू करण्यात आले आहेत.

Pune News : घरापासून शाळेपर्यंत पाठलाग; शाळकरी मुलीचा विनयभंग

यानुसार लोहगड आणि घेरेवाडी परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होता येणार नाही. समाज भावना भडकतील अशा घोषणा करू नये. या परिसरात आंदोलन मोर्चा करू नये.(Pune News) या परिसरात धार्मिक विधीसाठी पशुपक्ष्यांचा बळी दिला जाऊ नये. याशिवाय लोहगड व घरेवाडी हद्दीत स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर फ्लेक्स लावण्यासही प्रतिबंध करण्यात आलाय. सोशल मीडिया वरून जातीय द्वेष पसरवणारे मेसेज किंवा खोटी माहिती पोस्ट करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.