Pune : तळजाई टेकडीवरील 108 एकरांत होणार ‘ऑक्सिजन पार्क’; सर्वोच्च न्यायालयाने दिला महापालिकेच्या बाजूने निकाल

सुभाष जगताप - आबा बागूल यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – तळजाई टेकडीवरील १०८ एकरांत ‘ऑक्सिजन पार्क’ होण्याचा अडथळा दूर झाला आहे. इतर जागेचे रखडलेले भूसंपादनही लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने दिला.

”तळजाई टेकडीवरील १०८ एकर जमीन ऑक्सिजन पार्कसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया दि. ६ डिसेंबर २००६ पासून आपल्या प्रयत्नातून सुरू झाली. ही प्रक्रिया करताना अनेक अडथळे निर्माण झाले होते. आपल्याला अनेक आमिषे दिली गेली. परंतु, याला बळी न पडता प्रयत्न चालू ठेवले. जागा मालक अनेकदा कोर्टात गेले. परंतु, तेथेही त्यांना यश आले नाही. शेवटी काही जागा मालक सुप्रीम कोर्टात गेले. मात्र, तेथेही त्यांना यश मिळाले नाही. नुकतेच सुप्रीम कोर्टात या जागेचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या बाजूने दिला आहे. आता या १०८ एकर जागेवर ऑक्सिजन पार्क होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणेकर नागरिक व तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्या असंख्य नागरिकांचा हा विजय आहे, ” अशी प्रतिक्रिया स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी दिली. प्रदीर्घ अशा लढ्याला अखेर यश मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

”पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सन २०१५ मध्ये विधी विभागाकडे ही बाब निदर्शनास आणून दिली. तळजाई टेकडीबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या लार्जेस्ट बेंचकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी पाठपुरावा चालू केला. या प्रकरणाचा खटला पाच खंडपीठाकडे जाऊन आज या विषयाचा अस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस इंदिरा बॅनर्जी, जस्टिस विनित सारन, जस्टिस एम.आर.शहा व जस्टिस रवींद्र भट या न्यायमूर्तींनी पुणे शहराच्या हिताच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला.

यासाठी वेळोवळी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील, तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार व सौरभ राव, निवृत्त विधी सल्लागार रवींद्र थोरात व विधी अधिकारी सी.निशा चव्हाण व पनेल विधी सल्लागार बी.आर.दातीर यांचे समवेत पुणे महानगरपालिकेत बैठका घेऊन योग्य दिशेने पाऊल उचलल्याने पुणेकरांच्या हिताची जागा मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.  आता तळजाई टेकडीचे जतन, संवर्धन, जैव विविधता उदयान करण्यासाठी पुणे मनपाच्या सर्व विभागांनी योग्य पाऊल उचलावीत, जेणेकरून जैव विविधता उदयान संदर्भातील सर्व कामे त्वरीत मार्गी लावून एक सुंदर ऐतिहासिक पर्यावरणपूरक जैव विविधता उदयान व्हावे,” अशी मागणी आबा बागूल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.