Pune News : नाविन्याचा ध्यास, प्रयोगशील वृत्ती जोपासावी – शुभांगी शिंदे

एमपीसी न्यूज – अपयशाने खचून न जाता उमेदीने उभा राहा.चांगल्या यशासाठी व्यावहारिक दृष्टीकोन जपला पाहिजे.नाविन्याचा ध्यास आणि प्रयोगशील वृत्ती आपल्याला यशस्वी करते,” असे मत जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार शुभांगी शिंदे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मित्र मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेत शुभांगी शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक स्थापत्य अभियंता सुभाष पत्की, उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुजाता शेणई, पर्यवेक्षक राजेंद्र खजुरे, प्रा. के. बी. पवार व प्रा. सुनील पवार उपस्थित होते.

शुभांगी शिंदे म्हणाल्या, “राइट बंधूंना विमान तयार करण्याकरिता त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक प्रयोग करावे लागले.अनेकदा लोकांनी त्यांना ‘तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही’ असे ऐकवले. मात्र, त्यांनी जिद्द आणि प्रयोगशील वृत्ती सोडली नाही. मोकळ्या रानात जाऊन पक्षांचे निरीक्षण करून त्यांनी विमान तयार केले.शेवटी त्यांना त्यात यश मिळाले.त्यामुळे आपण जिद्द आणि प्रयोगशीलता अंगी कारावी.”

सुभाष पत्की यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.राजेंद्र खजुरे, प्रा. के. बी. पवार व प्रा. सुनील पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.