Pimpri : नैवेद्याची पुरणपोळी भुकेलेल्या लोकांना दान; रॉबिनहुड आर्मीचा होळीच्या दिवशी उपक्रम

शहरातील 95 सोसायट्यांमधून जमा झाल्या 5,900 पुरणपोळ्या

एमपीसी न्यूज – होळीच्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवुन हा सण साजरा केला जातो. परंतु वाया जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या रॉबिनहुड आर्मी संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे या पुरणपोळ्या दान करा, असे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला व शहरातील 95 सोसायट्यांनी यामधे सहभाग नोंदवत 5,900 पुरणपोळ्या दान करण्यात आल्या.

 

रुढी व परंपरा जपत शास्त्रासाठी एक तुकडा होळीत टाकून उरलेली पुरणपोळी दान करा, यासाठी सोशल मीडिया तसेच सोसायट्यांमध्ये जाऊन या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली होती. या उपक्रमास भरभरुन प्रतिसाद मिळाला व 95 सोसायट्यां मधून तब्बल 5,900 पुरणपोळ्या दान करण्यात आल्या तसेच विविध दात्यांकडे जाऊन पोळ्या जमा केल्या. जमा केलेल्या पुरणपोळ्यांचे पिंपरी- चिंचवड व पुणे स्टेशनसह 26 ठिकाणी वाटप करण्यात आले.

 

गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथे हा उपक्रम राबविण्यात येत असून पहिल्या वर्षी 1,200 तर दुसऱ्या वर्षी 3,500 पुरणपोळ्या वाचवून गरजूंपर्यंत पोहोचवल्या होत्या. या उपक्रमासाठी प्राजक्ता रुद्रवार, राहुल पाटील, लतेश कुलकर्णी, आकाश अग्रवाल, झील पटेल, देवेंद्र भागवत, सेजल कुलकर्णी यांच्यासह रॉबिनहुडचे 85 हून अधिक सभासदानी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.