Pimpri : पावसाळ्याची लगबग, शहरात नागरिकांकडून ताडपत्रीची खरेदी

Pimpri: Almost rainy season, citizens buy tarpaulins in the city

एमपीसी न्यूज – जूनच्या पहिल्या दिवसापासून शहरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची पावसाळा पूर्व आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर ताडपत्री व प्लास्टिक शीट्स खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

पावसाळ्यात गळणारे छत दुरुस्त करण्यासाठी नागरिकांकडून ताडपत्री व प्लास्टिक शीट्स खरेदी केली जात आहेत. एरवी वाट पहायला लावणार्‍या पावसाचे जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच आगमन झाले आहे. त्यामुळे उकाडा कमी होवून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. आता पावसाळापूर्व कामांची पिंपरी-चिंचवडकरांसह लगतच्या ग्रामीण भागात लगबग आहे.

शहरातील बहुसंख्य भागात चाळी आहेत. त्याचबरोबर विक्रेते, झोपडपट्टी परिसर, शहरात ठिकठिकाणी दिसणारी मजुराची पाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक शीट्स खरेदी होत असते. पिंपरी परिसरात ताडपत्री व प्लास्टिक कागदांची होलसेल विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे शहरातील आणि शहराबाहेरील  ग्रामीण परिसरातून ताडपत्री घेण्यासाठी नागरिक पिंपरीत येत असतात. शेतकर्‍यांना गोठ्यासाठी तसेच शहरातील छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक, टपरीधारक, भाजी विक्रेते यांनाही ताडपत्रीची आवश्यकता असते. अशा व्यक्तींकडून पावसाळ्यासाठी ताडपत्रीची खरेदी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.