Pune: मागील वर्षीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची कामे वेगात करा- महापौर

Pune: In order to prevent accidents like last year flood situation, speed up sanitation works- Mayor murlidhar mohol

एमपीसी न्यूज- मागीलवर्षी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची कामे वेगात करा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

कात्रज ते आंबील ओढा व लगतच्या नाल्यांच्या सफाईची महापौरांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, श्रीनिवास कंदुल, अधिक्षक अभियंता प्रवीण गेडाम, अग्निशमन दल प्रमुख प्रशांत रणपिसे, उपायुक्त माधव देशपांडे, सुश्मिता शिर्के, सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवाजी लंके, संजय गावडे, विजय शिंदे, सुरेश जगताप, अशोक घोरपडे, जयंत भोसेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

महापौर म्हणाले, पाहणी करण्यात आलेल्या बहुतांश नाल्यांची मोठ्या प्रमाणावर सफाईचे कामे झालेली आहेत. ज्या ठिकाणी अद्यापही काही प्रमाणात कामे करणे आवश्यक असून उर्वरित कामे जलदरीत्या पूर्ण करण्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

महापौरांनी प्रत्यक्ष नालेसफाईच्या घटनास्थळी पदाधिकारी, नगरसेवक, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल व संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

महापालिका आयुक्त गायकवाड म्हणाले, मागील वर्षीच्या पूरपरिस्थिती बाबत पुनरावृत्ती टाळण्याकरिता कात्रज तलाव स्वच्छता मोहिमेअंतर्गत युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली आहे.

पाण्याची पातळी खाली करण्यात आली असून, वहन क्षमता अधिक सुलभ व जलद होण्याकरिता सायफन पद्धतीनुसार नियोजन करण्यात आलेले आहे.

कात्रज ते दत्तवाडी परिसरातील नालेसफाई पूर्णांशाने करण्यात आलेली आहे. काही उर्वरित कामे अर्थात राडारोडा, अडथळे तातडीने काढण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील वर्षीसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.