Pimpri: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची नियुक्ती रद्द

एमपीसी न्यूज – राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या ‘महाविकासआघाडी’ सरकारकडून भाजपच्या राजवटीत झालेल्या महामंडाळावरील नियुक्त्या टप्प्या-टप्प्याने रद्द केल्या जात आहेत.  सामाजिक न्याय विभागाने बुधवारी (दि.18) दहा महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळावरील अमित गोरखे यांची देखील नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे त्यांचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा गेला आहे. 7 जून 2019 रोजी नियुक्ती झालेल्या गोरखे यांना दहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला आहे.

राज्यात भाजपचे सरकार असताना पिंपरी-चिंचवड शहरातील अमित गोरखे यांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 7 जून 2019 रोजी गोरखे यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी झाली होती. त्यांना जवळपास दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. त्यांनी दहा महिन्यात समाजासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची नियुक्ती बुधवारी (दि.18) सामाजिक न्याय विभागाने रद्द केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही राज्यमंत्री दर्जाची पदे गेली आहेत.

याबाबत बोलताना अमित गोरखे म्हणाले, ”कार्यालय ताब्यात मिळणे, विधानसभेची आचारसंहिता यामुळे प्रत्यक्ष काम करायला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. कालावधी जास्त मिळाला नाही. त्यामुळे कामाला वाव मिळाला नसल्याची खंत आहे. परंतु, मिळालेल्या तीन महिन्यात समाजातील एमपीयसी, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत अभ्यासासाठी पाठविण्यासाठी 100 कोटी मंजूर करुन घेतले. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी 100 कोटीचा निधी मंजूर केला. अण्णाभाऊंच्या नावे तिकीट प्रकाशित केले. बीज भांडवल योजनेतून अनेकांना कर्ज मिळवून दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शहरातील स्थानिक नेत्यांमुळे काम करण्याची संधी मिळाली”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.