Pimpri Crime News: अखेर आमदार पुत्र पोलिसांना सापडला, सिद्धार्थ बनसोडेसह चौघांना रत्नागिरीतून अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – कचरा संकलन करणार्‍या कंपनीच्या सुपरवायझरचे अपहरण करून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्ट, चॉपरने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह चार जणांना निगडी पोलिसांनी गुरूवारी रत्नागिरीतील कोळंबे येथून अटक केली आहे. आरोपी गेल्या 13 ते 14 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते.

सिद्धार्थ अण्णा बनसोडे (वय-21, रा. पिंपरी), आमदारांचा स्वीय सहाय्यक सावंतकुमार रमेश सल्लादल्लू (वय-48, रा. लिंक रोड), सतिश रमेश लांडगे (वय-40, रा. कासारवाडी), रोहित पंद्री (वय-25, रा. चिंचवड स्टेशन), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांना न्यायालयात हजर केले असता 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर, यापूर्वी अतिश महादेव जगताप, रोहित ऊर्फ सोन्या गोरख भोसले, सुलतान इम्तीयाज कुरेशी, ऋतिक लक्ष्मण वाघमारे, शुभम आळसंदे, मोहित ऊर्फ एमडी संजय धिवार, अनमोल गुंजेकर, साजीद मेहबुब शेख, रोहित कुसाळकर यांना अटक केली होती.

या प्रकरणी आत्तापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अ‍ॅन्थोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे आमदार बनसोडे यांच्या पीएला उलटे बोलल्याचे समजून आमदार बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी आकुर्डी येथील हेडगेवार भवन शेजारी असलेल्या कार्यालयातून पवार यांचे अपहरण केले. आमदार बनसोडे यांच्या मुलासह सावंत कुमार, लांडगे, साजिद, सुलतान यांच्यासह 15-18 जणांवर पवार यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आमदार बनसोडे यांच्या मुलाला पोलीस अटक करत नसल्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली होती. तसेच त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचा दबाव आहे की काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगितले होते. अखेर 15 दिवसानंतर पोलिसांनी आमदारपुत्रासह चौघांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उरण येथे असल्याचे समजले. पोलिसांच्या दोन टिम रवाना झाल्या. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपींनी उरण येथून वाकडी न्यु पनवेल येथील फार्म हाऊसवर गेल्याचा बनाव रचला.

पोलिस पनवेल येथे गेले. मात्र, आरोपी रत्नागिरीला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर आरोपी कोळंबे येथील श्रमसाफल्य बंगला येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनसोडे, लांडगे, सल्लादुल्ला, पन्द्री यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.