Article by Harshal Alpe : समाजमाध्यमे जरूरीच आहेत…!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – क्षणभर हे शीर्षक वाचून, कदाचित पुढे काही तरी राजकीय स्वरूपाचे लिखाण येण्याची काहींना आशा वाटेल, पण यात असे काही राजकीय असण्याचे काहीच कारण नाही, कारण सध्या या विषयावर बरीच साधक बाधक चर्चा सुरू आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम लगेच बंद होण्याच्या वावड्या म्हणा, कहाण्या म्हणा चालूच आहेत. 

खर तर ही समाज माध्यम ज्या वेळी भारतात सुरू झाली, त्या वेळी कुणाला ही याची कल्पना नव्हती, की आज असे काही तरी होईल आणि सरकारला यावर बंधन आणून, ही सगळी माध्यमे भारतात बंद करण्याची वेळ किंवा तशी चर्चा करावी लागेल.

ही माध्यम आणि त्यांचा हेतू त्यावेळी साफ होता की, नवनवीन मित्र जोडा आणि मनाजोगते बोला आणि व्यक्त व्हा!बाकी ठिकाणी येणारी बंधने इथे अजिबातच अपेक्षित नव्हती. निखळ मैत्री जपण्यासाठीच ही माध्यमे होती, पण हळूहळू या मैत्रीच्या व्यासपीठाचे राजकीय हव्यासपीठ कधी झाले आणि उकिरडा होण्याच्या मार्गावर ही माध्यमे कधी गेली, हे कळलेही नाही.

खरंतर या माध्यमांवर टीका करताना आपण सर्वांनीच एकदा मंथन करायची गरज आहे. दोन गोष्टी आहेत ज्या प्रचंड समस्यांना जन्म देत आहेत आणि पहिल्यांदा त्या दोन गोष्टींवर तोडगा काढण्याची गरज आहे.

पहिली म्हणजे सध्या आपल्यातली नकारात्मकता आणि भांडखोर वृत्ती वाढलेली दिसते. एखाद्याचे पटले नाही की खाऊ की गिळू, असे होऊन भाषेची आणि नात्याची कसलीही भीड न बाळगता समोरच्याला संपवण्याचीच आपण तयारी करतो. संयतपणा किंवा दुर्लक्ष करण्याची तयारीच नाही .

दुसरी गोष्ट म्हणजे, सरसकट वाईट गोष्टींवर विश्वास ठेवण्याची वृत्तीही वाढते आहे आणि यात सतत दुसर्‍यावर अविश्वास आणि संशयी वृत्तीही वाढीस लागते आहे. कालपर्यंत चांगले होते ते एका मताने फक्त एका मताने देशद्रोहीही होतात आणि एकाच विधानाने ते एका नेत्याचे भक्त म्हणून हिणवले जातात.

टीका करताना आम्ही हेही  सोयीस्करपणे  विसरून जातो की, मत व्यक्त करणार्‍या व्यक्तीचे कार्य आहे तरी काय? त्याने कधी तरी, काही तरी चांगले काम केले असेलच की, पण नाही! समाजमाध्यमांत त्याचे मत आल्या आल्या आम्ही त्या मतावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्याच नावाने अर्वाच्च भाषेत त्याला आई-बहिणींवरून शिव्या देऊन मोकळे होतो. याचाही विचार करत नाही की, आमची ती भाषा नवीन पिढीही वाचते आहे, त्याचं काय?

समाज माध्यम बंद होतीलही. त्या जागी नवीही येतील, पण पसरलेल्या या नकारात्मक्तेचं काय करायचं? त्याच्यावर कोणी बंधनं आणायची, आपणच ना! ती आपण कधी आणणार? येणारा काळच याचे उत्तर देईल, नक्की देईल!

पण प्रश्न हा आहे की, ही माध्यमं, जी खरं तर फार महत्त्वाची अशासाठी आहेत, कारण यांच्याकडे नीट पाहिल्यास कलागुणांना वाव देणारीच ही माध्यमे आहेत , नवलेखकांना व्यासपीठ आहे, तसेच संशोधकांना एखादी गोष्ट किंवा आपले संशोधन जगासमोर आणण्याचे साधन आहे.

त्याचबरोबर काम शोधणार्‍या प्रत्येकाला नवनवीन मार्ग याच माध्यमांमध्ये नक्की सापडू शकतात. नवनवीन ओळखीतून काही तरी समाजहितार्थ कामही होऊ शकते. राजकारणाच्या बजबजपुरीपेक्षा संयतपणे नाविन्याचा ध्यास घेऊन हीच माध्यमं वापरल्यास, यावर बंदी आणण्याची कधीही गरज पडणार नाही आणि आज ज्या कुणालाही धोकादायक वैगेरे वाटत असतील, त्यांनाही अशा बंदीचा विचार करण्याची गरजच भासणार नाही.

फक्त या माध्यमांकडे आपणच सकारात्मक पद्धतीने बघूया ना! दोष माध्यमांचा आहे की नाही, माहीत नाही. आपल्या नजरेचाही असूच शकतो की! ती नजरच सुधारूया ना, म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील, नाही का???

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.