Pimpri : दोन गटांमधील हाणामारीत तिघे गंभीर जखमी ; माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्यावरही हल्ला!

एमपीसी न्यूज – दोन गटामध्ये तुफान हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्यावर 30 ते 40 जणांनी मिळून हल्ला केला. ही घटना आज (सोमवारी) सकाळी आसवाणी यांच्या घरासमोर घडली. घटनेनंतर आसवाणी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

डब्बू आसवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 15 ते 20 लोक सकाळपासून घराच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरत होते. घरासमोर सकाळपासून निवडणुकीसाठी स्लिप वाटपाचे काम चालू होते. काही वेळाने 30 ते 40 जण आले. त्यांनी माझ्या घरासमोर थांबलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यात मला, भावाला आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांची तीन तोळे सोन्याची साखळी गहाळ झाली आहे.

हा सर्व प्रकार परिसरात दहशत पसरवण्यासाठी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे यासाठी हा हल्ला केला आहे. अरुण ठाक, बबलू सोनकर, दीपक ठाक, अनिल पारचा, जितू मंतानी, लछु पुलानी, मोहित पुलानी आणि त्यांचे साथीदार होते. सर्वांनी मिळून अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांसोबत असलेल्या चार बॉडीगार्डने पिस्तुल दाखवले. यावर आसवाणी यांच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रतिहल्ला केला असता हल्लेखोर मोटारगाडी सोडून पळून गेले असल्याचेही आसवाणी यांनी सांगितले.

तिघांवर तलवारी व कोयत्याने वार

या घटनेत बबलू सोनकर यांचे वाहन चालक अभिनव कुमार सिंग (वय 38, रा. पिंपरी) आणि अन्य दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डब्बू आसवाणी आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मतदानाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.