Pimpri : खासगी जागेवरील 150 अतिक्रमणे हटविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे खासगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण  करून अनधिकृतपणे सुमारे 150 घरे बांधून जागा हडपण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून सुरू आहे. ही अनधिकृत बांधकामे तातडीने पाडावीत तसेच या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या तसेच त्यांना पाणी जोड व वीज जोड देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नामवंत बांधकाम व्यावसायिक मिलिंद पोखरकर यांनी आज जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे केली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन पोखरकर यांनी त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांना त्याबाबत माहिती दिली. हा तक्रारअर्ज केल्यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका संभवतो. आपल्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर ठेवावी, असेही पोखरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

तळेगाव दाभाडे येथे सर्व्हे क्रमांक ३९४/२ (नवीन) पैकी जागा आपण रितसर खरेदीखत करून १५ सप्टेंबर २००९ रोजी विकत घेतली. त्यानुसार जागेच्या सात-बारा उताऱ्यावर आपल्या नावाची मालकी हक्कात नोंद देखील झाली आहे. या मिळकतीवर सुभाष यशवंत खळदे, मुरलीधर यशवंत खळदे, गोविंद यशवंत खळदे, विलास यशवंत खळदे व इतर १४ जणांनी कोणताही मालकी हक्क नसताना व त्या संदर्भात न्यायालयात दावे प्रलंबित असताना जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे सुमारे १५० खोल्या असलेल्या चाळी बांधल्या आहेत. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून या अनधिकृत बांधकामांना नियम धाब्यावर बसवून पाणी जोड मिळविण्यात आले आहेत तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेकायदेशीर वीज जोड देखील मिळवले आहेत, असा आरोप पोखरकर यांनी केला.

या चाळींमध्ये बेकायदेशीर भाडेकरू ठेवून लाखो रुपयांची कमाई ते करीत आहेत. या चाळींमध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक देखील आश्रयाला असल्याची माहिती मिळाली आहे. या भाडेकरूंची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, याकडे पोखरकर यांनी लक्ष वेधले.

आपल्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी कागदोपत्री कोणताही पुरावा नसताना तलाठ्याला दमदाटी करून पीकपाणी घेत असल्याबद्दल साता-बारा उताऱ्यावर खोटी नोंद करून जागा हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुभाष यशवंत खळदे, मुरलीधर यशवंत खळदे, गोविंद यशवंत खळदे यांच्या विरुद्ध भा. द. वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१ व ३४ नुसार गुन्हा नोंदवून न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती पोखरकर यांनी दिली.

याबाबत खळदे यांचे वकील अ‍ॅड. कुणाल खळदे यांनी सांगितले की, ‘सादर जागेच्या मूळ मालक रंजना रवी दाभाडे होत्या. त्यांचा आणि खळदे यांचा न्यायालयात दावा सुरू असताना न्यायालयाची परवानगी न घेतला दाभाडे यांनी तिलोक चंदानिया आणि खुबू मंतानिया यांना दिली. त्यानंतर रंजना यांचा मृत्यू झाला. जागेच्या मालकीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. त्या जागेवर अतिक्रमण केलेले नाही. त्या जागेवर शेतकरी आणि अन्य व्यवसाय करणारे नागरिक राहत आहेत. ही जागा पूर्णतः खासगी असल्यामुळे त्यावर अतिक्रमण करण्याचा कोणताही हेतू नाही. मागील 65 वर्षांपासून त्या जागेचा ताबा आणि मालकी हक्क खळदे यांच्याकडे आहे, असा दावा करून त्यांनी पोखरकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.