Pimpri: क्वारंटाईन सेंटरमधील 53 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 51 लाखाचा खर्च

Expenditure of Rs 51 lakh for salaries of 53 contract employees in the quarantine center:

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेने बालेवाडी क्रीडा संकुल आणि आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हाऊसकिपिंगच्या कामासाठी बीव्हीजी इंडीया कंपनीने 50 सफाई कर्मचारी आणि तीन सुपरवायझर नेमले आहेत. त्यांच्या दोन महिन्यांच्या वेतनावर 51 लाख रूपये खर्च होणार आहेत.

पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या विचारात घेता शहरात भविष्यात रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूमुळे शहरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यादृष्टीने महापालिकेने बालेवाडी क्रीडा संकुल, मोशी प्राधिकरण, आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

तेथे बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत हाऊसकिपिंगच्या कामासाठी मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. त्यापैकी मोशी प्राधिकरण येथे यापूर्वी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून त्यांच्यासमवेत करारनामाही झालेला आहे.

बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये बीव्हीजीने 12 मे पासून 10 कर्मचारी आणि एक सुपरवायझर अशा 11 लोकांची नेमणूक केली होती. त्यांनतर आणखी 10 कर्मचारी तेथे वाढविण्यात आले.

तसेच आकुर्डीतील पिंपरी – चिंचवड इंजिनिअरींग कॉलेज येथे कोविड केअर सेंटरमध्ये 30 कर्मचारी आणि दोन सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कोविड केअर सेंटरमध्ये काम करणा-या एका सफाई कर्मचा-याला प्रतिदिन दीड हजार रूपये तर सुपरवायझरला प्रतिदिन दोन हजार रूपये वेतन दिले जात आहे.

म्हणजेच बालेवाडी क्रीडा संकुलातील 20 कर्मचारी आणि एक सुपरवायझर यांच्या एक महिन्याच्या वेतनासाठी 10 लाख 6 हजार रूपये खर्च होत आहे.

तर, इंजिनिअरींग कॉलेजमधील 30 कर्मचारी आणि दोन सुपरवायझर यांच्या एक महिन्याच्या वेतनासाठी 15 लाख 41 हजार रूपये खर्च होत आहे.

या कर्मचा-यांना दोन महिन्यांसाठी अथवा वैद्यकीय विभागामार्फत काढण्यात आलेल्या ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत येणा-या अनुक्रमे 20 लाख 13 हजार रूपये आणि 30 लाख 83 हजार रूपये असा एकूण 50 लाख 96 हजार रूपये खर्च होणार आहे.

तसेच या ठिकाणी रूग्णांची संख्या वाढल्यास बीव्हीजी इंडियातर्फे आणखी मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.