Pimpri : फुलबाजाराचे अखेर स्थलांतर; शगुन चौकाने घेतला मोकळा श्वास

आज पहिल्याच दिवशी या फुलबाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. : Florist market migration : Shagun Chowk took a deep breath

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या पिंपरी शगुन चौक येथील फुलबाजाराचे आज, शनिवारी अखेर ‘क्रोमा’ शेजारील जागेत स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून शगुन चौकाने मोकळा श्वास घेतला.

पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या फुलांच्या मागणीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते.

मात्र, फुल बाजारात आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याने शगुन चौकातील जागा अपुरी पडत होती. त्यामुळे त्याठिकाणी व्यापार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

याशिवाय वाहतुकीची समस्यादेखील भेडसावत होती. जागेअभावी गेल्या 15 वर्षापासून फुल बाजार पहाटे सहा ते नऊ या वेळेत पिंपरीतील शगुन चौकात भरत होता.

जागेअभावी आणि वेळेअभावी वाढत्या फुल उत्पादनामुळे शेतक-यांना त्यांचा शेतीमाल पर्यायाने कमी भावाने विकावा लागतो. त्यामध्ये बरेच आर्थिक नुकसान होत असे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 2017 पासून वेळोवेळी महापालिकेकडे कायमस्वरूपी जागेची मागणी होत आहे. त्यास अनुसरून महापालिका भूमी-जिंदगी विभागाने पिंपरीतील क्रोमा शोरूम शेजारील जागेची पाहणी केली.

त्यांनतर पालिकेने क्रोमा शेजारील जागा फुलबाजाराला भाड्याने देण्याचे मान्य केले होते. अखेर आज शनिवार 1 ऑगस्ट 2020 रोजी फुलबाजाराचे स्थलांतर करण्यात आले.

यामुळे शगुन चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

हा फुलबाजार शासनाचे सर्व नियम पाळून सकाळी 6 ते 10 या वेळेत चालणार आहे.  फुलबाजार चालू झाल्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

आज पहिल्याच दिवशी या फुलबाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.