Mumbai: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन : Mumbai: Tribute from the Chief Minister on the occasion of the birth centenary of Lokshahir Anna Bhau Sathe

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती, हे वर्ष अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा.

अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.

आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मनामनात पोहचवली.आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी व महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली.

अण्णा भाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ थोर समाजसुधारक होते.

लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी देशासाठी, समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे ते सदैव स्मरणात राहतील.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महान साहित्यिक होते. मानवतावादी लेखक होते. दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं.

उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी जीवनभर मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीवर राहून भूमिका बजावली.

राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंना असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.